Sat, Jul 20, 2019 21:50होमपेज › Pune › ‘ऑपरेशन ऑल आउट’मुळे गुन्हेगार धास्तावले

‘ऑपरेशन ऑल आउट’मुळे गुन्हेगार धास्तावले

Published On: Jun 30 2018 1:44AM | Last Updated: Jun 30 2018 1:40AMपिंपरी : प्रतिनिधी

पोलिस उपायुक्त गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवलेल्या ‘ऑपरेशन ऑल आउट’मुळे शहरातील गुन्हेगारी विश्व ढवळून निघाले. गुरुवारी (दि.28) रात्री नऊ ते बारापर्यंत ही  मोहीम सुरू होती. या मोहिमेत अवघ्या तीन तासात तब्ब्ल 279 गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली. गुन्हेगारांच्या घरावर अचानक पोलिसांच्या धाडी पडू लागल्याने शहरातील गुन्हेगार सैरभैर झाले आहेत.

शहरातील वाढती गुन्हेगारी विचारात घेऊन उपायुक्तांनी ही मोहीम हाती घेतली. यामध्ये तडीपार,गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले,फरार अशा वेगवेगळ्या गुन्ह्यातील आरोपी तपासण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या होत्या. उपायुक्तांच्या आदेशानुसार शहरातील 31 तडीपार गुंड तपासण्यात आले. त्यापैकी एकजण हद्दीत हत्यारानिशी मिळून आला. त्याला ताब्यात घेत त्याच्यावर तात्काळ कारवाई करण्यात आली. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले 44 आरोपी तपासण्यात आले. त्यातील 15 आरोपी मिळून आले. प्रत्यके हद्दीतील माहितगार 152 गुन्हेगार तपासले त्यातील 50 जण सापडले. रेकॉर्डवरील व इतर 57 गुन्हेगार तपासले असता 20 गुन्हेगार पोलिसांना मिळाले. वॉरंट बजावण्यात आलेल्या 29 आरोपींपैकी 02 आरोपी मिळाले. तसेच 22 संशयितांवर कारवाई करण्यात आली. नाकाबंदी दरम्यान 76 वाहनांची झडती घेण्यात आली.

279 गुन्हेगारांपैकी 77 जणांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 68/69 प्रमाणे कारवाई करण्यात आली. 113 जणांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 33 आरडब्ल्यू अंतर्गत कारवाई करण्यात आली. तर 76 जणांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 110/112/117 अंतर्गत कारवाई करण्यात आली. 102 प्रमाणे 10 तर मुंबई प्रोव्हिजन अ‍ॅक्ट कलम 85 (1) प्रमाणे 03 गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली.  या मोहीमेत पोलिसांनी शहरातील गुन्हेगारांचे अड्डे, झोपटपट्ट्यांचा परिसर पिंजून काढला. गुन्हेगार रात्रीच्या वेळी कुठे असतात, काय करतात याची इतंभूत माहिती या वेळी संकलित करण्यात आली. मोकळ्या मैदानावर गप्पा मारत असलेल्या अल्पवयीन मुलांना समज देऊन सोडण्यात आले. तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर देखील कारवाई करण्यात आली. ‘मिशन ऑल आऊट’मध्ये एकूण 50 अधिकारी आणि 400 कर्मचारी सहभागी झाले होते. उपायुक्तांच्या या ‘मिशन ऑल आऊट’मुळे पोलीस अधिकार्‍यांसह करणाचार्‍यांमध्ये उत्साह संचारल्याचे पाहावयास मिळत होते.