Sat, Jul 20, 2019 23:25होमपेज › Pune › पुण्यात आयपीएलचे फक्‍त दोन सामने

पुण्यात आयपीएलचे फक्‍त दोन सामने

Published On: Mar 18 2018 1:06AM | Last Updated: Mar 17 2018 11:56PMपुणे : प्रतिनिधी

इंडियन प्रिमियर लीग (आयपीएल) च्या 2018 च्या हंगामासाठी पुण्याचा संघ नसला तरी पुणेकर क्रिकेट रसिकांसाठी मात्र दोन सामन्यांची पर्वणी मिळणार आहे. त्याच बरोबर एक आंतरराष्ट्रीय सामनाही पुणेकरांच्या वाट्याला मिळाला आहे. 

आयपीएलच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यानुसार, दि. 23 मे रोजी होणारा ‘एलिमिनेटर’ आणि दि. 25 मे रोजी होणारा ‘क्वालिफायर टू’ ची लढत महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) गहुंजे येथील स्टेडियमवर होणार आहे. पुण्यासह इंदूर, राजकोट, कोलकता, लखनौ हे संघ ‘एलिमिनेटर’ आणि ‘क्वालिफायर टू’ या महत्वाच्या लढतींचे यजमानपद भूषविण्याच्या शर्यतीत होते. सध्या पुण्याचा संघ या स्पर्धेत खेळत नसला तरी 2017 चे उपविजेते असल्याने पुण्याची बाजु त्या ठिकाणी भक्‍कम ठरली. त्यामुळे पुण्यात या लढती खेळविण्यावर बैठकीत एकमताने शिक्कामोर्तब झाला. 

आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलची बैठक होण्यापूर्वी या दोन्ही लढतींचे यजमानपद लखनौला देण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला होता. उत्तर प्रदेश क्रिकेट संघटनेला स्वत:चे स्टेडियमदेखील नाही. तरीही या संघटनेचे राजीव शुक्ला हे आयपीएलचे स्टेडियम असल्याने त्यांनी या लढती लखनौमध्ये खेळविण्याच्या दृष्टीने हालचाली केल्या होत्या. मात्र, गत उपविजेते या नात्याने या दोन्ही लढतींचे यजमानपद मिळणे, हा पुण्याचा हक्क आहे, अशी खंबीर भूमिका एमसीएचे अध्यक्ष अ‍ॅड. अभय आपटे यांनी घेतली होती.

तसेच या बैठकीमध्ये राजीव शुक्ला वगळता आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलमधील बहुतेक सर्व सदस्य पुण्याच्या बाजूने होते. याची जाणीव झाल्याने शुक्लांनी लखनौचा आग्रह सोडला आणि प्रत्यक्ष बैठकीत पुण्याला या लढतींचे यजमानपद देण्यावर शिक्कामोर्तब झाले. दरम्यान, या दोन आयपीएल सामन्यांबरोबरच नोव्हेंबर महिन्यामध्ये होणारा भारत -वेस्ट इंडिजचा सामनाही याच स्टेडियमवर देण्याबाबतही निर्णय घेण्यात आलेला आहे. 

याबाबत महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. अभय आपटे म्हणाले की,  गेल्या वर्षी पुणे संघ उपविजेता राहिल्याने पुण्याची बाजू भक्‍कम होती. त्यामुळेच आपल्याला एलिमिनेटर’  ‘क्वालिफायर टू’ या दोन आयपीएलचे सामने पुण्याला मिळालेले आहेत. याव्यतिरिक्‍त भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील एक आंतरराष्ट्रीय सामनाही नोव्हेंबर महिन्यामध्ये याच मैदानावर खेळविण्यास मंजुरी मिळालेली आहे.

 

Tags : pune, pune news, IPL, matches, IPL 2018, two matches,