होमपेज › Pune › परदेशी उच्च शिक्षणासाठी केवळ सात विद्यार्थी पात्र   

परदेशी उच्च शिक्षणासाठी केवळ सात विद्यार्थी पात्र   

Published On: Dec 04 2017 1:36AM | Last Updated: Dec 04 2017 12:03AM

बुकमार्क करा

पिंपरी : प्रतिनिधी 

महापालिकेच्या वतीने परदेशीत उच्च शिक्षण घेणार्‍या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना अर्थसहाय केले जाते. या योजनेसाठी सन 2017-18 या वर्षांत केवळ 7 विद्यार्थी पात्र झाले आहेत. त्यामुळे तब्बल 1 कोटी 98 लाख 50 हजार रूपयांचा निधी अद्याप पडून आहे. 

महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागाच्या वतीने मागासवर्गीय कल्याणकारी योजनेत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षण घेण्यासाठी प्रत्येकी दीड लाख रूपयांचे अर्थसहाय केले जाते. या योजनेसाठी वर्षभरात केवळ 9 अर्ज महापालिकेस प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 2 अर्ज अपात्र ठरले असून, 7 जण पात्र ठरले आहेत. 

एका विद्यार्थ्यांस अर्थसहाय देण्यात आले असून, उर्वरित 6 विद्यार्थ्यांना ते देण्यात येणार आहे. प्रत्येकी दीड लाखप्रमाणे एकूण 9 लाख रूपये देण्यात येणार आहेत. तसेच, अपात्र विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांची पुर्तता केल्यानंतर त्यांनी त्यांचा लाभ देण्यात येणार आहे. या खर्चात मान्यता देण्याचा विषय बुधवारी (दि.6) होणार्‍या स्थायी समिती सभेपुढे ठेवण्यात आला आहे.

महापालिकेच्या सन 2017-18 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात या योजनेसाठी तब्बल 2 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. ‘मागासवर्गीय युवक/युवतींच्या उच्च शिक्षणासाठी अर्थसहाय’ या उपलेखाशिर्षाअंतर्गत ही तरतूद केली आहे. मात्र, अद्याप त्यातील 1 कोटी 98 लाख 50 हजारांचा निधी शिल्लक आहे. या योजनेसंदर्भात जनजागृती करून अधिकाधिक विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, अशी सूचना नगरसेवकांनी वारंवार केली आहे. मात्र, प्रशासन जनजागृतीकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे. 

विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार रक्कम

नागरवस्ती विकास योजनेअंतर्ग परदेशी शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना दीड लाख रूपये अर्थसहाय केले जाते. ही रक्कम संबंधित विद्यापीठाच्या नावे धनादेश काढला जात होता. आता त्यात बदल केला असून  विद्यापीठाच्या परवानगीने विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात संबंधित रक्कम जमा केली जाणार आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ अधिकाधिक विद्यार्थ्यांना घेता येणार आहे, असे प्रभारी अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांनी सांगितले.