Tue, Apr 23, 2019 01:37होमपेज › Pune › अतिरिक्त पोलिस आयुक्त फक्त एकाच दिवसाचा

अतिरिक्त पोलिस आयुक्त फक्त एकाच दिवसाचा

Published On: Jul 01 2018 2:15AM | Last Updated: Jul 01 2018 1:48AMपुणे : देवेंद्र जैन 

लोहमार्ग पोलिस अधीक्षक प्रभाकर बुधवंत यांना वेळेत पदोन्नती न मिळाल्यामुळे सेवानिवृत्तीच्या शेवटच्या दिवशी ती देऊन त्यांना पुणे शहरात उत्तर विभागाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त म्हणून नेमण्यात आले व सायंकाळी ते निवृत्त पण झाले. अशाप्रकारे एक दिवसाचा अतिरिक्त पोलिस आयुक्त पाहण्याची वेळ पोलिस आयुक्त कार्यालयावर आली. राज्याच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे. 

गृह खात्याच्या अनागोंदी कारभारामुळे राज्यातील पोलिस खात्यामधील अनेक अधिकार्‍यांना मनस्ताप होत आहे, अनेक अधिकार्‍यांच्या पदोन्नती रखडल्या आहेत. पुणे व राज्यातील बहुतेक सर्व पोलिस अधिकार्‍यांचा नेमणूक कार्यकाळ उलटून गेला आहे. पण, या अतिशय महत्त्वाच्या खात्याकडे लक्ष देण्यास कोणासही वेळ नाही. याच अनागोंदीचा फटका प्रामाणिक अधिकार्‍यांना बसत आहे.

पोलिस खात्याकरिता सचिव हा भारतीय पोलिस सेवेतीलच असावा, अशी मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. पहिल्यापासुन गृहखात्याचा सचिव हा भारतीय प्रशासन सेवेतून येतो, हीच बाब आयपीएस अधिकार्‍यांना कायम खटकत आली आहे. प्रशासनिक सेवा व कायदा सुव्यवस्था राखण्याकरिता असलेली पोलिस सेवा यामध्ये मोठा फरक असल्याचे एका निवृत्त पोलिस अधिकार्‍याने ‘पुढारी’ प्रतिनिधीला सांगितले. त्यांच्यानुसार पोलिस दलातील अधिकार्‍याला जर सचिव म्हणून नेमले तर त्याचा पूर्ण पोलिस दलाला फायदा होईल. वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या फायलींचा निपटारा वेळेत होईल व पदोन्नतीसारख्या गंभीर प्रश्‍नांना वेळेत न्याय मिळेल.