पुणे ः प्रतिनिधी
राज्यातील सर्वाधिक दुचाकींची संख्या असलेल्या पुण्यात प्रदूषणाचा आलेख उंचावत आहे. दरम्यान, शासनाने प्रदूषण पातळीवर नियंत्रण आणण्यासाठी पर्यावरणपूरकसीएनजीवर दुचाकी चालविण्यासाठी प्रोत्साहन दिले होते. त्या पार्श्वभूमीवर पुुण्यात सीएनजी स्कुटर सुरू करण्यात आली. शहरात सीएनजी पंपाची संख्याही 52 पर्यंत झाली. मात्र, जनजागृतीच्या अभावामुळे अवघ्या 400 सीएनजी स्कुटर दुचाकी रस्त्यावर धावत आहेत. त्यामुळे प्रदूषणमुक्तच्या स्वप्नाचा प्रश्न उपस्थित होत आहे.
चारचाकी सीएनजीसाठी चांगला प्रतिसाद मिळत असताना त्या तुलनेत दुचाकीला चांगला प्रतिसाद पुणेकरांकडून मिळालेला नाही. राज्यातील पहिलाच प्रयोग म्हणून पुण्यात सीएनजी दुचाकी सुरू करण्यात आली. अतिशय परवडणारी ही दुचाकी मात्र केवळ समन्वय आणि जनजागृतीअभावी संख्या मर्यादित राहिली आहे. महाराष्ट्र नॅचरल गॅस लि. (एमएनजीएल)कडून यासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता असून, पुण्याचे प्रदूषण कमी होण्यास याचा हातभार लागणार आहे. सीएनजीवर दुचाकी करण्यासाठी महाराष्ट्र नॅचरल गॅस आणि आयटक या कंपनीने पुढाकार घेतला.
स्कुटर दुचाकीवर किट बसवले असून, यामध्ये एक किलोचे दोन सिंलिंडर आहेत. यामध्ये एक किलोमध्ये साधारण 60 किलोमीटर इतके अॅव्हरेज मिळत आहे. शिवाय याचा मेटेंनन्स खर्चही कमी लागतो. यामध्ये गॅस संपल्यास पेट्रोलचाही वापर दुचाकीस्वाराला करता येतो. वाढत्या इंधन दरामुळे पेट्रोल मोपेड दुचाकीला सीएनजीचा चांगला पर्याय आहे. सध्या सीएनजी प्रतिकिलो 52 रुपये असा दर आहे, तर पेट्रोलचा दर साधारण 84 रुपये आहेत. पेट्रोल आणि सीएनजीची तुलना केली, तर सीएनजीची स्कुटर फायदेशीर ठरते. यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करून दुचाकी सीएनजी वापराकडे वळवणे आवश्यक आहे.
धोकाविरहित सीएनजी
नागरिकांमध्ये सीएनजी दुचाकी वापरण्यामध्ये धोका असल्याचे बोलले जाते. यासंदर्भात एमएनजीएलचे अधिकार्यांकडून सांगण्यात आले की, सीएनजी वापरामुळे कुठलाही धोका संभावत नाही. सर्व चाचण्या घेऊनच दुचाकीसाठी सीएनजी वापरण्याचा निर्णय झाला आहे. नवीन स्कुटर दुुचाकींना सीएनजी किट बसवणे सोपे आहे.
पेट्रोलच्या तुलनेत परवडणारा पर्याय आहे.
2 किलो सीएनजीद्वारे 120 किलोमीटर प्रवास.
1 लिटर पेट्रोलद्वारे 50 किलोमीटर प्रवास
सीएनजी 75 टक्के कमी घातक द्रव्ये सोडते त्यामुळे स्कुटरमुळे होणार्या हवेच्या प्रदूषणात 20 टक्के घट होण्यास मदत.
सीएनजीचा दर 52 रुपये प्रतिकिलो.
पेट्रोलचा दर 83.76 रुपये प्रतिलिटर
सीएनजी स्कुटर 100 रुपयांत सुमारे 120 किलोमीटर धावेल.
पेट्रोल स्कुटर 100 रुपयांत सुमारे 55 किलोमीटर धावेल.
सीएनजी किट बसवण्यासाठी साधारण 15 हजार 500 रुपये खर्च
बँकेकडून सीएनजी किट बसविण्यासाठी कर्ज दिले जाते.