Thu, Nov 15, 2018 18:10होमपेज › Pune › ‘रेशन’ दुकान नको रे बाबा...!

‘रेशन’ दुकान नको रे बाबा...!

Published On: May 17 2018 1:25AM | Last Updated: May 17 2018 12:08AMपुणे ः नरेंद्र साठे

रेशन धान्य दुकान चालवायला घेण्यासाठी, पूर्वी स्पर्धा लागलेली असायची. अलीकडे मात्र हेच दुकानदार दुकान नको रे बाबा.. असे म्हणताना दिसत आहे. ‘ई-पॉस’ मशिनमुळे सर्व व्यवहार ट्रॅकवर आल्याने, शहरात 80 दुकानांची गरज असताना केवळ 24 जणांनीच प्रतिसाद दिला आहे. काळाबाजारास संधीच न उरल्याने नवीन दुकाने सुरू करण्याकडे त्यांनी पाठ फिरवल्याचे दिसते.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील 11 क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत 885 रेशन दुकाने आहेत. या सर्व दुकानांमध्ये ‘पॉस’ मशिनचा वापर होतो आहे. शहरात 3 लाख 46 हजार शिधापत्रिकाधारक असून, त्यात अंत्योदय अन्न योजनेचे शिधापत्रिकाधारक 12 हजार 631 तर अन्न सुरक्ष योजनेचे लाभार्थी 3 लाख 69 हजार 182 नागरिक आहेत.

शासनाने वाढत्या लोकसंख्येचा विचार करून ज्याठिकाणी अधिक शिधापत्रिकाधारक आहेत, त्याठिकाणी नवीन दुकानांसाठी प्रस्ताव मागविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील नवीन 80 रेशन दुकानांसाठी अर्ज मागविण्यात आले होते. 80 दुकानांसाठी 160 अर्ज आले, त्यातील 41 अर्ज मंजूर करण्यात आलेे. त्यापैकी 24 जणांनी दुकान सुरू केले. 

वितरण व्यवस्था ‘पॉस’ मशिनवर, शिधाधारकांचे आधार लिकिंग यामुळे काळाबाजाराला चाप बसला. एका विक्री व्यवहारामागे दुकानदाराला केवळ दीड रुपया कमिशन दिले जाते. हे कमिशन अपुरे असल्याने प्रस्ताव मंजूर असूनही दुकान सुरू करण्यास टाळाटाळ होताना दिसत आहे.

सर्व प्रक्रिया ऑनलाइन केल्यामुळे स्वस्त धान्य दुकान चालवताना महिलांना प्रशिक्षण नसल्याने त्यांना अडचणी येतात. जास्त स्वस्त धान्य दुकानांची शहरामध्ये आवश्यकता आहे. महिलांना दुकाने चालवताना अडचण येत असल्याने कदाचित नवीन दुकाने घेण्यास कोणी धजावत नसेल. मात्र, सध्या स्वस्त धान्य दुकानांची संख्या वाढून त्याद्वारे योग्य पद्धतीने धान्य वितरण होण्याची आवश्यकता आहे. - घोंगे हिराबाई, पुणे जिल्हा सचिव, जनवादी महिला

स्वस्त धान्य दुकानांसाठी अर्ज मागवले होते. त्यापैकी ज्यांनी कागदपत्रांची पूर्तता केली त्यांची दुकाने सुरू झाली आहेत. कागदपत्रांची पूर्तता न केलेली दुकाने अद्याप सुरू झालेली नाहीत. कागदपत्रांची पूर्तता करण्याची जबाबदारी बचत गटांची आहे. - आशा होळकर, सहायक अन्नधान्य वितरण अधिकारी