होमपेज › Pune › ऑनलाईन भाडेकरू नोंदणी प्रक्रिया पुन्हा सुरू

ऑनलाईन भाडेकरू नोंदणी प्रक्रिया पुन्हा सुरू

Published On: Sep 04 2018 1:18AM | Last Updated: Sep 04 2018 12:42AMपुणे : प्रतिनिधी

अनेक दिवसांपासून बंद असणारी ऑनलाईन भाडेकरू नोंदणी प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली आहे. टेनंट पोर्टलवर जाऊन भाडेकरूंची नोंदणी करावयाची आहे. दरम्यान, भाडेकरू नोंदणीसोबतच नागरिकांना चारित्र्य पडताळणी, विविध परवानग्यासाठी याठिकाणी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. भारतीय नॅशनल रेकॉर्ड क्राईम ब्युरोकडून ही ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

शहरात स्थलांतरितांंची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. दिवसागणिक ही संख्या वाढते. दरम्यान, सांस्कृतिक व स्मार्ट सिटीचे शहर दहशतवाद्यांच्या हिट लिस्टवर आहे. शहरात बाँबस्फोटाच्या घटना घडल्या होत्या. त्यात दहशतवाद्यांनी शहरात वास्तव्य करून हे स्फोट घडवून आणले होते. अनेक दहशतवादी तसेच नक्षली कारवाईतील धागेधोरे पुण्यात सापडले आहेत. त्यामुळे पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने भाडेकरूंची नोंदणी अनिवार्य केली आहे. भाड्याने राहणार्‍या नागरिकांनाही अनेक कामांसाठी ही नोंदणी उपयुक्त ठरते. यापूर्वी ही नोंदणी पोलिस ठाण्यात जाऊन करावी लागत असे. परंतु वेळ वाचावा, यासाठी ‘टेनंट इन्फॉर्मेशन फॉर्म’ या नावाने ऑनलाईन सुविधा उपलब्ध केली. नागरिकांना घरबसल्या भाडेकरू नोंदणी करता येत होती.  मात्र, गेल्या एक  ते दीड महिन्यापासून ही ऑनलाईन सुविधा तांत्रिक कारणांमुळे बंद पडली होती.

अशी करावी ऑनलाईन नोंदणी

पुणे पोलिसांच्या  www.punepolice.co.in या वेबसाईटवर गेल्यानंतर टेनेंट इन्फर्मेशन फॉर्म याच्यावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर www.mhpolice.maharashtra.gov.in ही नवीन लिंक उघडेल. या वेबसाईटवर ऑनलाईन सर्व्हिसवर क्लिक केल्यानंतर नागरिकांना भाडेकरूची ऑनलाईन माहिती देण्याबरोबरच विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नागरिकांना युजरनेम व पासवर्ड तयार करून लॉगीन करावे लागेल. या ठिकाणी नागरिकांना भाडेकरू, पेइंग गेस्ट पडताळणी, चारित्र्य प्रमाणपत्र विनंती, घटना कार्यक्रम विनंती, निषेध, संप विनंती, नोकर चारित्र्य पडताळणी, सी फॉर्म, वाहनांची चौकशी, गणेशोत्सव व नवरात्रोत्सव परवानगी अर्ज अशा सुविधा देण्यात आल्या आहेत.