Tue, Apr 23, 2019 20:09होमपेज › Pune › ‘ऑनलाईन शॉपिंग’ करताय... सावधान

‘ऑनलाईन शॉपिंग’ करताय... सावधान

Published On: Jan 22 2018 1:23AM | Last Updated: Jan 21 2018 11:42PMपिंपरी : अमोल येलमार

सध्या सगळीकडे ‘सेल’चा धुमाकूळ सुरू आहे. 12-15 टक्क्यांपासून 90 टक्के ऑफपर्यंतच्या जाहिराती दिसत असून, खरेदीसाठी झुंबड उडाली आहे. यामध्ये ऑनलाईन शॉपिंगवाले पण कमी नाहीत. याही शॉपिंगवर मोठ्या सवलती आहेत. मात्र सवलतींच्या बरोबरीने तुमचा खिसा कापणार्‍यांच्या संख्येतदेखील वाढ होत आहे. नवनवे फंडे वापरून ऑनलाईन शॉपिंग करणार्‍यांना लुटले जात आहे. त्यामुळे ‘एकाच छताखाली (वेबसाईटवर) सर्व काही’ विकणार्‍यांच्या फसवेगिरीपासून स्वतःचा बचाव करण्याची गरज निर्माण झाली आहे.

सध्या इंटरनेटवर गेले की, जहिरातीचा भडीमार पाहायला मिळतोच. यातच प्रत्यक्षात दुकानांमध्ये मिळणार्‍या वस्तूंची किंमत आणि ‘ऑनलाईन’ वस्तूचा दर यामध्ये फारच तफावत असते. वस्तूचे दर कमी असल्याने साहिजकच खरेदीदार याकडे वळतो. मात्र अनेकजण ‘ऑनलाईन फ्रॉड’मुळे खरेदी टाळतात.

‘ऑनलाईन शॉपिंग’ म्हणजे निव्वळ फसवणूकच होते असे नाही. त्यासाठी कोणत्या साइटवरून आपण खरेदी करत आहोत हे देखील पाहणे महत्त्वाचे आहे. आपण ‘ऑर्डर’ केलेल्या ‘ब्रॅण्ड’च्या बदल्यात ‘डुप्लिकेट’ अथवा थेट साबणाची वडी-दगड देखील ‘बॉक्स पॅक’ करून होम ‘डिलेव्हरी’ झाल्याची उदाहरणे आहेत. मॉल अथवा मोठ्या दुकानांच्या किमती आणि ‘ऑनलाईन शॉपिंग’च्या किमतीत बराच फरक असतो. त्यामुळे देखील ‘ऑनलाईन शॉपिंग’ करणार्‍यांच्या संख्येत वाढ होत आहे. खरेदीसाठी ‘क्लिक’ करण्याआधी पूर्ण वेबसाइटवर सर्व पर्यायाची माहिती घेणे गरजेचे आहे. 

अनेक वेबसाइटवर ग्राहकांची तक्रार नोंदवण्याची-निवारणाची सोयही उपलब्ध असते. आपण जिथून खरेदी करू तिथे ही व्यवस्था आहे का हे वस्तूची मागणी करण्यापूर्वी तपासायला हवे. ऑनलाइन खरेदीपूर्वी सुरक्षित खरेदी कशी करावी याबाबत इंटरनेटवरून माहिती घ्यावी, ज्या कंपनीचे ‘प्रॉडक्ट’ खरेदी करायचे आहे त्या कंपनीची ‘ऑनलाईन’ खरेदी संदर्भाताल माहिती तपासावी, ‘ऑनलाईन प्रॉडक्ट’ विकणार्‍या कंपनीची किंवा वेबसाईटची सत्यता तपासून पाहावी. 

वेबसाइटवर दिलेली कंपनीची माहिती नीट वाचावी, ‘ऑनलाइन’ खरेदी झाल्यानंतर आर्थिक तपशील भरताना काळजी घ्यावी. आपल्या बँकेची खरी वेबसाइट लिंक दिलेली असली तरच असे तपशील भरावेत, सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्या वेबसाईटवरून तुम्ही तुमची आवडती वस्तू खरेदी कराल, त्या वेबसाईच्या सर्वात खालच्या ठिकाणी वेरी साईन ‘ट्रस्डेट’ अशा पद्धतीचे ‘सर्टीफिकेट’ त्या वेबसाईटवर दिलेले आहे की नाही हे तपासून पाहणे गरजेचे आहे.

या गोष्टी टाळा

शक्यतो थेट तुमच्या बँकेशिवाय आणि ऑनलाइन खरेदी कंपनीशिवाय इतर कोणत्याही मध्यस्थ ऑनलाईन वेबसाईटवरून आर्थिक व्यवहार करू नयेत, मौल्यवान वस्तू स्वस्त दरात विकली जात असेल तर शक्यतो ती वस्तू विकत घेऊ नये. घ्यायचीच असेल तर, पूर्ण माहिती आणि खात्री झाल्याशिवाय ती वस्तू खरेदी करु नये.

‘सायबर सेल’कडे तक्रारी

शहरामध्ये यापूर्वीही अनेकदा ऑनलाईन खरेदी केल्यानंतर फसवणुकीचे प्रकार घडले असून, गुन्हेही दाखल झाले आहेत. यातील काही गुन्हे उघडकीस आले आहेत. अजूनही फसवणूक झाल्याच्या तक्रारी ‘सायबर सेल’कडे येत आहेत. यावर प्राथमिक चौकशी करून गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.