Sun, Jul 21, 2019 05:35होमपेज › Pune › आरटीओची ऑनलाईन प्रक्रिया  इंग्रजीतूनच! 

आरटीओची ऑनलाईन प्रक्रिया  इंग्रजीतूनच! 

Published On: May 11 2018 1:12AM | Last Updated: May 10 2018 11:46PMपुणे : प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अंतर्गत कार्यालयीन कामकाज व नागरिकांशी थेट संवाद साधण्याचे कामकाज जरी मराठी भाषेतून होत असले तरी आरटीओच्या ऑनलाईन अर्ज भरण्याची वेबसाईटवरील प्रक्रिया मात्र, इंग्रजीमधूनच सुरू आहे. शासनाच्या योजनांची माहिती जनसामान्यांना देताना वा त्यासंदर्भात सर्वसामान्यांशी चर्चा करताना आणि दूरध्वनीवर बोलताना आरटीओतील सरकारी बाबू मराठीचा वापर करत आहेत. तसेच प्रशासकीय अधिकार्‍यांच्या बैठकांमध्येही मराठीचाच वापर होत आहे. त्याचबरोबर रिक्षाचालक, कॅबचालक यांना बॅच देताना चालकाला मराठी भाषेचे ज्ञान अवगत असल्याशिवाय बॅच दिला जात नाही. मात्र, ऑनलाईन अर्ज, नोंदणी प्रक्रियेदरम्यानच इंग्रजी भाषेचा वापर करावा लागत आहे. ऑनलाईन प्रक्रिया जर मराठीत झाली तर त्याचा स्थानिक नागरिकांना नक्कीच फायदा होणार आहे.