Mon, Apr 22, 2019 15:37होमपेज › Pune › वन विभाग उभारणार कृत्रिम घरटी

वन विभाग उभारणार कृत्रिम घरटी

Published On: Jun 15 2018 1:24AM | Last Updated: Jun 15 2018 1:16AMपुणे : प्रतिनिधी

झाडांची संख्या मोठया प्रमाणावर कमी होते आहे. त्यातच बैठी घरे जाऊन, उंचच उंच इमारती उभ्या रहात आहेत. वळचणीच्या जागाही कमी झाल्या आहेत. स्थानिक झाडे, ज्यांच्यावर पक्षी घरटी करतात, त्यांची संख्याही कमी होते आहे. अशा परिस्थितीत पक्षांच्या अन्न व निवार्‍याचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. वन विभागाच्या वतीने पक्षांच्या निवारासाठी कृत्रिम घरटी तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, हा उपक्रम प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाच्या अधिकार्‍यांनी दिली.

सध्याच्या परिस्थितीत अनेक कारणांमुळे पक्ष्यांच्या अधिवासावर संक्रांत आलेली आहे. त्यामुळे पक्ष्यांच्या संख्येवर त्याचा परिणाम होऊ लागला आहे. मानवी हस्तक्षेपामुळे पक्ष्यांची घटती संख्या, पर्यावरण व अन्न साखळीस बाधक आहे. पुणे शहराव्यतिरिक्‍त इतर ठिकाणी पक्ष्यांच्या निवासाची फारशी अडचण निर्माण होत नाही. जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी पक्षांनी झाडांवर घरटी तयार केलेली आहेत. तर काही ठिकाणी स्वयंसेवी संस्था आणि पर्यावरण प्रेमींनीही कृत्रिम घरटी तयार करुन, पक्षांच्या निवासाची सोय केली आहे. काही ठिकाणी तर त्यांच्या पाण्याची आणि खाण्याचीही सोय केली. शहरपातळीवर मात्र पक्षांची फरफट होत असल्याचे दिसून येते. वन विभागाच्या वतीने पक्ष्यांच्या कृत्रिम घरट्यांसाठी मार्च महिन्यामध्ये तीन लाख रुपयांची विशेष तरतुद  करून प्रायोगिक तत्वावर कृत्रिम घरट्यांचा उपक्रम हाती घेतला.  प्रथम 100 कृत्रिम घरटी तयार करण्यात आलेली आहेत. ही कृत्रिम घरटी भांबुर्डा येथील वन विभागाच्या वनांमध्ये तसेच वेताळ टेकडीवरील जंगलात लावण्यात येणार आहेत. त्यानंतर दुसर्‍या टप्प्यामध्ये शहरातील वनविभागाच्या जंगलामध्ये, तसेच तळजाई, हनुमान टेकडी येथे कृत्रिम घरटी ठेवण्यात येणार आहे.