पुणे : प्रतिनिधी
राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक भरती करण्यासाठी घेण्यात येणारी अभियोग्यता व बुध्दिमापन चाचणीला दि. 12 रोजी सुरुवात झाली असून, ही परीक्षा येत्या 21 तारखेपर्यंत चालणार आहे. परीक्षा सुरू झाल्यापासून रविवार दि. 17 पर्यंत सहा दिवसांमध्ये 1 लाख 28 हजार 523 विद्यार्थ्यांपैकी 1 लाख 9 हजार 224 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आहे. यातील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची एकूण टक्केवारी 84.98 असल्याची माहिती राज्य परीक्षा परिषदेने दिली आहे.
2012 मध्ये बंद झालेल्या शिक्षक भरतीनंतरही अनेक शाळांनी वैयक्तिक मान्यतांच्या आणि ना-हरकत प्रमाणपत्रांच्या आधारे शिक्षक भरती केली. या भरतीमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमियततादेखील झाली. त्यामुळेच राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांसह खासगी व्यवस्थापनाच्या अनुदानित, अंशत: अनुदानित व अनुदानास पात्र घोषित केलेल्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षण सेवकांच्या रिक्त पदांवर भरती करताना सर्व उमेदवारांना निवडीची समान संधी मिळावी व शिक्षण सेवकपदासाठी उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांची निवड व्हावी, यासाठी शिक्षण सेवकांची भरती अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीच्या आधारे करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
राज्यातील 67 केंद्रांवर अभियोग्यता आणि बुध्दिमापन चाचणी घेण्यात येत आहे. यात इंग्रजी, गणित आणि बुध्दिमापन यावर जास्त भर देण्यात आला. केवळ 120 मिनिटांमध्ये 200 प्रश्न सोडविणे आवश्यक आहे. परंतु गणित आणि इंग्रजी या विषयांवर देण्यात आलेला भर आणि विद्यार्थी गोंधळात पडतील असे विचारलेल्या प्रश्नांमुळे गुणांची शंभरी पार करणे देखील अवघड होत असल्याचे परीक्षार्थींनी सांगितले. काही केंद्रांवर तांत्रिक गोंधळाला सामोरे जावे लागत आहे. यामध्ये सर्व्हर हँग होणे, गुण न समजणे असे प्रकार होत आहेत. तर, विद्यार्थिनींचे लग्नानंतरचे आडनाव आणि अगोदरचे आडनाव यामधील फरकदेखील महिला परीक्षार्थींसाठी डोकेदुखीचा विषय ठरत आहे. शासनाने विद्यार्थ्यांची कसोटी पाहणारी ही परीक्षा घेतलीच आहे. तर, तेवढ्याच पारदर्शकपणे शिक्षक भरतीदेखील पार पाडावी. नाहीतर अभियोग्यता आणि बुध्दिमापन चाचणी परीक्षा हा केवळ शिक्षकभरतीचा फार्स ठरण्याची शक्यता असल्याचे विद्यार्थ्यांनी बोलून दाखवले आहे.