Fri, May 24, 2019 20:30होमपेज › Pune › एक लाख संस्थांची नोंदणी रद्द

एक लाख संस्थांची नोंदणी रद्द

Published On: Mar 12 2018 12:53AM | Last Updated: Mar 12 2018 12:42AMपुणे : प्रतिनिधी

गेल्या पाच व त्यापेक्षा अधिक वर्षांपासून बदल अर्ज, ताळेबंद अहवाल (ऑडिट रिपोर्ट) सादर न करणार्‍या तब्बल एक लाख 548 धर्मादाय संस्थांची नोंदणी धर्मादाय विभागाने रद्द केली आहे. तसेच झिरो पेंडन्सी अभियानांतर्गत राज्यातील 10 विभागांतून 38 हजार 272 बदल अर्ज निकाली काढण्यात आले असल्याची माहिती धर्मादाय आयुक्‍त शिवकुमार डिगे यांनी दिली.

राज्यात जवळपास साडेसात लाख धर्मादाय संस्था आहेत. देशात असणार्‍या सर्वाधिक धर्मादाय संस्थांची संख्या महाराष्ट्रामध्ये आहे. अनेक संस्था सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक व इतर सामाजिक उत्तरदायित्वाच्या उद्देशाने नोंद होतात; पण नंतर त्या धर्मादाय कार्यालयाच्या नियमांचे या संस्था पालन करत नसल्याचे आढळून आले आहे. 

प्रत्येक संस्थेला वर्षाला त्यांचा ऑडिट रिपोर्ट, तसेच संस्थेच्या विश्‍वस्तांमध्ये बदल असेल, तर त्याचा बदल अर्ज किंवा इतर कागदपत्रे धर्मादाय कार्यालयाला सादर करणे आवशक आहे. 

पण अनेक संस्थांकडून या अटींची पूर्तता होत नसल्याने त्यांची नोंदणी रद्द करण्यासंदर्भात कायद्यात बदल करण्यात आला आहे. त्यानुसार धर्मादाय आयुक्‍तांनी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये  निष्क्रिय संस्थांची नोंदणी रद्द करण्याची मोहीम सुरू केली आहे. संस्थांना एक महिन्यात त्यांचे म्हणणे मांडण्याची नोटीस पाठवण्यात येत आहे. ज्या संस्था एक महिन्याच्या आत धर्मादाय कार्यालयाकडे कागदपत्रांची पूर्तता करतील त्याच संस्था सुरू ठेवण्यात येतील. बाकीच्या संस्थांची नोंदणी रद्द करण्यात येईल. ऑक्टोबरपासून आतापर्यंत एक लाख 548 संस्थांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे.

झीरो पेंडन्सी मोहीम 15 फेब्रुवारीपासून राज्यात राबविण्यात आली आहे. त्यानुसार राज्यातील हजारो संस्थांचे वर्षानुवर्षांचे 38 हजार 272 बदल अर्ज निकाली काढण्यात आले आहेत. कोणताही वाद किंवा हरकत नसलेले विश्‍वस्त बदल, प्रॉपर्टी आदीच्या बदल अर्जांचा यामध्ये समावेश आहे.

 
निष्क्रिय संस्थांची नोंदणी रद्द करण्याची मोहीम सुरू असून, त्याअंतर्गत आणखी एक लाख निष्क्रिय संस्थांना नोटीस पाठवण्यात आली आहे. तर झिरो पेंडन्सीअंतर्गत अनेक वर्षांपासूनचे बदल अर्ज निकाली काढण्यात आले असून, सर्व कार्यालयांमध्ये झिरो पेंडन्सी मोहीम पूर्ण झाली आहे.     - शिवकुमार डिगे, राज्य धर्मादाय आयुक्‍त