Sat, Jan 19, 2019 05:42होमपेज › Pune › पुणे : चोरट्यांच्या हल्‍ल्यात एक ठार

पुणे : चोरट्यांच्या हल्‍ल्यात एक ठार

Published On: Jan 12 2019 10:21AM | Last Updated: Jan 12 2019 10:45AM
पुणे : प्रतिनिधी

आंबेगाव तालुक्यातील पारगाव (शिंगवे) येथील माळी मळा वस्तीवरील कुशाबा पिराजी लोखंडे (वय ८०) यांचा चोरट्यांच्या मारहाणीत मृत्यू झाला. या हल्‍ल्यात त्यांची पत्नी सुमन कुशाबा लोखंडे (वय ७२) गंभीर जखमी झाल्या. आंबेगाव तालुक्यातील मंचर पोलीस स्टेशन हद्दीत असणा-या पारगाव (शिंगवे) येथे आज (ता.१२) पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास चोरट्याने कुशाबा लोखंडे व त्यांची पत्नी सुमन यांच्या घरात कौल काढून प्रवेश केला.

यावेळी झोपलेल्या लोखंडे दांपत्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्‍ल्यात कुशाबा यांचा मृत्यू झाला. रात्री उशीरा हा प्रकार उघडकीस आल्यानंतर लोखंडे दांपत्याला उपचारासाठी मंचर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र कुशाबा यांचा उपचारापुर्वीच मृत्यू झाला. हल्‍ल्यात जखमी झालेल्या सुमन यांची प्रकृती ही गंभीर असून त्यांना उपचारासाठी सिद्धी रुग्णालय मंचर येथे दाखल केले आहे.

मागील पंधरा दिवसांपूर्वी मांदळेवाडी येथील आदक कुटुंबावरही चोरट्यांनी अशाच प्रकारे हल्ला करुन चोरी केली होती. चोरीचे प्रमाण वाढल्याने गेल्या काही दिवसांपासून पोलिस चौकीची मागणी करण्यात येत आहे.