Wed, Apr 24, 2019 11:52होमपेज › Pune › गोळीबारात एकजण ठार

गोळीबारात एकजण ठार

Published On: Jan 20 2018 1:41AM | Last Updated: Jan 20 2018 1:09AMसणसवाडी : वार्ताहर 

शुक्रवारी (दि. 19 ) सकाळी 11.30 च्या सुमारास गंगाराम बाबूराव दासरवाड (वय 30, रा. सणसवाडी, ता. शिरूर, मूळ गाव शिकारा, ता. मुखेड, जि. नांदेड) हा युवक कंपन्यांना दूध देऊन दुचाकीने जात असताना सणसवाडी गावाजवळील दशक्रिया घाटाजवळ त्याच्यावर मोटारसायकलवरील दोघांनी गोळ्या झाडल्या. 

मिळालेल्या माहितीनुसार, गंगाराम हा सणसवाडी येथे 10 वर्षांपासून राहत असून, तो कंपन्यांमध्ये दूध व कॅन्टिनसाठी चपाती पुरवण्याचे काम ठेकेदारामार्फत करत होता. नेहमीप्रमाणे तो दूध देऊन परतत होता. या वेळी दुचाकीवरून आलेल्या दोघा हेल्मेटधारकांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. 

या हल्ल्यात तो जागीच कोसळला. या वेळी हल्लेखोर सणसवाडी दिशेने पळून जाण्यात यशस्वी झाले. मागून येणार्‍या नागरिकांनी दासरवाड याला रुग्णवाहिकेतून सणसवाडी येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यास नेत असताना त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. दरम्यान घटनास्थळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. संदीप पखाले, उपविभागीय अधिकारी गणेश मोरे, शिक्रापूरचे पोलिस निरीक्षक रमेश गलांडे यांनी तातडीने भेट दिली. यावेळी स्थळ पंचनामा करताना एक रिकामी पुंगळी आढळून आली. दरम्यान वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी तातडीने पोलिस पथक तपास मागावर रवाना केले आहे.  

गंगाराम बाबूराव दसरवाड यास वाघोली येथील एका खासगी रुग्णालयात डॉक्टरांनी केलेल्या तपासणीत त्याच्या डाव्या हाताच्या दंडावर छिद्र असून, शरीराच्या डाव्या बाजूस पोटात एक छिद्र, तसेच हृदयाच्या बाजूने पोटात एक छिद्र आढळून आले. दरम्यान गंगाराम याला नेमक्या किती गोळ्या लागल्या, हे शवविच्छेदनात कळणार आहे. गंगाराम याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पुणे येथील ससून रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.