Mon, Jul 22, 2019 13:12होमपेज › Pune › पुणे : DRDOच्या प्रयोगशाळेत आग, एकाचा मृत्यू 

पुणे : DRDOच्या प्रयोगशाळेत आग, एकाचा मृत्यू 

Published On: Jun 20 2018 11:05AM | Last Updated: Jun 20 2018 11:08AMपुणे : पुढारी ऑनलाईन

पुण्यातील संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ)च्या 'एचईएमआरएल' प्रयोगशाळेत आग लागल्याने एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. ही प्रयोगशाळा पाषण येथे आहे. ही घटना मंगळवारी झाली असून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेत आणखी एक कामगार जखमी झाला आहे.

काही स्फोटक वस्तू हाताळताना ही आग लागली. यात लक्ष्मीकांत सोनवणे (वय-26,रा.वारजे) यांचा मृत्यू झाला तर योगेश किर्तीकर हे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेवेळी सुरक्षेच्या दृष्टीने सर्व काही खबरदारी घेण्यात आली होती असे 'एचईएमआरएल'चे संचालक के.पी.एस.मूर्ती यांनी सांगितले. ज्या कामगाराचा मृत्यू झाला आहे आणि जो जखमी झाले आहे ते करार तत्वावर काम करत होते. या प्रकरणी 'डीआरडीओ'ने उच्च स्तरीय चौकशी समिती नियुक्त केली आहे. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळावरून आग ज्या स्फोटक वस्तूमुळे लागली त्याचे नमुने गोळा केले आहेत. या प्रकरणी पुढील तपास सुरु आहे.  

पुणे शहरातील 800 एकर जागेवर असलेल्या DRDOमधील HEMRL ही एक मुख्य प्रयोगशाळा आहे. भारतीय लष्करासाठी क्षेपणास्त्र, लढाऊ विमाने, रडार आदी अत्याधुनिक उपकरणे विकसित करण्यात DRDOचे महत्त्वाचे योगदान आहे. 

याआधी देखील झाले होते अपघात 

DRDOमध्ये याआधी देखील असे अपघात झाले आहेत. डिसेंबर 2015मध्ये झालेल्या स्फोटात काही कर्मचारी जखमी झाले होते. 2009मध्ये झालेल्या स्फोटात कोणी जखमी झाले नव्हते. तर 2002मध्ये झालेल्या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला होता.