Wed, Jan 23, 2019 04:27होमपेज › Pune › भिंतीला भगदाड पाडून दीड किलो चांदी चोरीस

भिंतीला भगदाड पाडून दीड किलो चांदी चोरीस

Published On: Aug 30 2018 1:23AM | Last Updated: Aug 29 2018 11:54PMपिंपरी : प्रतिनिधी

हिंजवडीच्या बारामती ज्वेलर्सच्या भिंतीला भगदाड पाडून चोरट्यांनी तब्बल दीड किलो चांदीचे दागिने चोरून नेले. ही घटना बुधवारी  (दि.29) सकाळी दहाच्या सुमारास उघडकीस आली. 

याप्रकरणी संतोष मधुकर लोळगे (37, रा. सहयोग कॉलनी, नढेनगर, काळेवाडी) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोळगे मंगळवारी (दि. 28)  रात्री नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घरी गेले होते. दरम्यान, चोरटयांनी दुकानाच्या भिंतीला छन्नी हातोड्याच्या सहाय्याने भगदाड पाडून आत प्रवेश केला. दुकानात असलेले दीड किलो वजनाचे चांदीचे दागिने आणि किरकोळ सोन्याचे दागिने असा एकूण 80 हजार रूपयांचा ऐवज घेऊन चोरट्यांनी पोबारा केला.

लोळगे यांना बुधवारी दुकान उघडल्यानंतर दुकानात चोरी झाल्याचे निदर्शनास आले. त्यांनी घटनेची माहिती हिंजवडी पोलिसांना दिली. पोलिसांनी दुकानातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून त्यामध्ये चोरटे कैद झाले असल्याचे सांगण्यात येत आहे.  पुढील तपास हिंजवडी पोलिस करीत आहेत.