होमपेज › Pune › कान्हेवाडीत शंभर टक्के करवसुली

कान्हेवाडीत शंभर टक्के करवसुली

Published On: Apr 07 2018 1:38AM | Last Updated: Apr 06 2018 11:18PMइंदोरी : ऋषिकेश लोंढे

मावळ तालुक्याच्या हद्दीलगत असलेल्या कान्हेवाडीतर्फे चाकण या ग्रामपंचायतीने आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी शंभर टक्के कर वसुली करून पाच वषार्र्ंची परंपरा कायम राखली आहे.

ग्रामपंचायतीने 2018-19 या आर्थिक वर्षासाठी महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व फी सुधारणा 2015 च्या अधिसूचनेनुसार घरपट्टीची दोन लाख 59 हजार 160 रुपये कराची रक्कम भांडवली मूल्यावर आधारित कर आकारणीनुसार पहिल्याच दिवशी पूर्ण वसुली केली. सह महिन्यांच्या आत करभरणा केल्यास पाच टक्के सूट दिली जाते. त्यानुसार सर्व कर भरणार्‍या मिळकतदारांना 12 हजार 434 रुपयांची सूट मिळाली आहे. गावातील 204 नळजोडधारकांना पाणी मीटर बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. या नळजोडधारकांनी प्रत्येकी एक हजार शंभर रुपये याप्रमाणे 2 लाख 24 हजार 400 रुपये एवढी आगावू पाणीपट्टी पहिल्याच दिवशी भरली आहे. घरपट्टी व पाणीपट्टी मिळून 4 लाख 83 हजार 560 रुपयांची रक्कम पहिल्याच दिवशी ग्रामपंचायतीकडे जमा झाली.

शंभर टक्के करवसुलीसाठी ग्रामविकास अधिकारी अरुण हुलगे, लेखनिक भाग्यश्री येवले व कर्मचारी महादू येवले यांनी परिश्रम घेतले. पाच वर्षापासून पहिल्याच दिवशी शंभर टक्के कर वसुली केली जाते.  सरकारच्या प्रत्येक नाविन्यपुर्ण उपक्रमात या ग्रामपंचायतीचा सहभाग राहिला आहे. त्यात लोकसहभागही शंभर टक्के असतो. त्यामुळे प्रत्येक अभियान व उपक्रम यशस्वी करून गावाने तालुका, जिल्हा, राज्य व केंद्र पातळीवरील अनेक पुरस्कार पटकावले आहेत. एक मॉडेल व्हिलेज म्हणून गावाचा नावलौकिक झाला आहे. भविष्यात गावाचा नावलौकिक टिकविण्यासाठी ग्रामस्थांच्या सहकार्याने विविध उपक्रम राबविण्याचा मनोदय सरपंच शांता येवले, उपसरपंच राहुल येवले, सदस्य व माजी आदर्श सरपंच भाऊसाहेब पवार, विनोद येवले, मीरा येवले, कुंदा पवार, कल्पना कडलक या सदस्यांनी व्यक्त केला आहे.

कान्हेवाडीतर्फे चाकण या गावाने निर्मलग्राम पुरस्कारांबरोबरच महात्मा गांधी तंटामुक्त पुरस्कार, गृहस्वामिनी पुरस्कार, पर्यावरण विकासरत्न पुरस्कार, शाहू फुले आंबेडकर स्वच्छ दलित वस्ती पुरस्कार, ग्राम गौरव पुरस्कार, राष्ट्रीय गौरव ग्रामसभा पुरस्कार असे अनेक पुरस्कार पटकावलेले आहेत. ग्रामपंचायतीला 2008 मध्येच ‘आयएसओ’ मानांकन प्राप्त झाले आहे. कान्हेवाडी तर्फे चाकण गावाला संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात 2017 मध्ये विभागात दुसरा क्रमांक मिळाला आहे. भविष्यात इतर गावांना स्वच्छ भारत मिशन सारख्या योजनांसाठी एक आदर्श गाव म्हणून एक स्वच्छ गाव म्हणून पाहण्यास निश्चितच आनंद होईल.

या गावातील बहुतुंश लोकांचा मुख्य व्यवसाय शेती  आहे. यामध्ये ऊस, फुलशेती, भाजीपाला, भात ही पिके प्रामुख्याने घेतली जातात. गावात 1990 पासूनच विकासात्मक कामांना सुरुवात झालेली दिसते. शासनाच्या आदर्श गाव योजनेत सहभाग नोंदवून गावाने नव्या विकासाची मुहूर्तमेढ रोवली. गावातील रस्ते, शाळा, अंगणवाड्या, युवकांसाठी व्यायामशाळा, स्मशानभूमी, सांडपाणी व्यवस्थापन, सार्वजनिक शौचालय, वैयक्तिक शौचालय, या सर्वच विषयांमध्ये सरपंच अन् तत्कालीन सदस्य यांनी झपाटून काम केले आहे. 204 कुटुंबांच्या सांडपाण्यावर गावात मोठी वृक्षलागवड करून सांडपाण्याचा पुनर्वापर केला आहे. गावातील घनकचरा प्रकल्प नाविन्यपूर्ण असून न कुजणारा कचरा-प्लास्टिक वेगळे केले जाते, तर कुजणारा कचरा नाडेप खड्ड़यात टाकला जातो. शुद्ध पाण्यासाठी गावात आर.ओ. फिल्टर प्लांट बसवण्यात आला आहे. 

विविध पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायत

गावाची सर्व करवसुली दरवर्षी 1 एप्रिलाच एका दिवशी जमा होते. गावात ठिकठिकाणी म्हणी, स्वच्छतेचे संदेश स्वच्छतेची शपथ, जलप्रतिज्ञा असे वेगवेगळे संदेश लावण्यात आले आहेत. गावातील सिमेंट रस्ते, त्या बाजूची झाडे, स्वच्छ घरे, मंदिरे गावाचे सौंदर्य वाढवण्यात मदत करतात. कान्हेवाडीला 2006 मध्येच निर्मलग्राम पुरस्कार मिळाला आहे. संपूर्ण गाव हागणदारीमुक्त झाले आहे. स्वच्छता हे गावाचं प्रतिक. प्रत्येक घरात स्वच्छते बरोबरच पाण्याचे व्यवस्थापन, दारात परसबाग, सांडपाणी व्यवस्थापन केले जाते. गावातील लोकांचे आरोग्य हे एका फिरत्या दवाखान्यावरून लक्षात येते. फिरता दवाखाना तर येतो, मात्र त्या तीन तासात रुग्णांची संख्या फारच कमी पाहायला मिळते.