Tue, Apr 23, 2019 05:37होमपेज › Pune › भाजपाला आश्‍वासनांचा विसर

भाजपाला आश्‍वासनांचा विसर

Published On: Jan 21 2018 2:52AM | Last Updated: Jan 21 2018 12:42AMपिंपरी : प्रतिनिधी

निवडणुकीत दिलेल्या आश्‍वासनांचा विसर भाजपाला पडला आहे. ती पूर्ण न केल्याचा आरोप करीत सर्वपक्षीय पदाधिकार्‍यांनी सत्ताधारी भाजपावर टीकास्त्र सोडले. धरणे आंदोलनात अनधिकृत बांधकामे नियमितीकरणासाठी नियमावलीत सोयीस्कर बदल करावेत, संपूर्ण शास्तीकर रद्द करावा, वसूल केलेला शास्तीकर करदात्यांना परत करावा,  कालबाह्य रिंग रोड रद्द करावा, या प्रमुख मागण्या करण्यात आल्या. 

एकदिवशीय सर्वपक्षीय आंदोलन शनिवारी (दि.20) पिंपरी चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे झाले. आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, शिवसेनेचे शहरप्रमुख योगेश बाबर, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखलेे, समाजवादी पार्टीचे शहराध्यक्ष रफीक कुरेशी, भारिप बहुजन महासंघाचे शहराध्यक्ष देवेंद्र तायडे, एमआयएमचे प्रवक्ते धम्मराज साळवे, प्रहार जनशक्तीचे नीरज कडू, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे गणेश दराडे, रिपब्लिकन सेनेचे हौसेराव शिंदे, शेतकरी कामगार पक्षाचे हरिश मोरे आदींनी सहभाग घेतला. तसेच, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, स्वराज अभियानाचे मानव कांबळे, अपना वतन संघटनेचे सिद्दीक शेख, नागरी हक्क सुरक्षा समितीचे प्रदीप पवार, पंचशील मंडळाचे दिलीप रणपिसे, घर बचाव संघर्ष समितीचे धनाजी येळकर, ओबीसी संघर्ष समितीचे आनंदा कुदळे, बोपखेल आंदोलन समितीचे संतोष घुले, विश्‍व कल्याण कामगार संघटनेचे दिलीप पवार आदींनी आंदोलन केले. 

प्रमुख मागण्यांसह शहरातील नागरिकांसाठी अंत्यविधीचा पूर्ण खर्च महापालिकेने करावा, बोपखेल व दापोडी रस्त्यासंदर्भात महापालिकेने दिलेल्या लेखी उत्तराप्रमाणे ताबडतोब कार्यवाही करावी, आदी मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या. आंदोलनात अनेकांनी भाजपाच्या कार्यपद्धतीवर रोष व्यक्त करीत खरमरीत टीका केली. दिलेली आश्‍वासने पूर्ण करण्यात सत्ताधारी भाजपा अपयशी ठरल्याची टीका अनेकांनी केली. 

दरम्यान, महापौर नितीन काळजे यांनी आंदोलनकर्त्यांना आश्‍वासनाचे लेखी पत्र दिले. अनधिकृत बांधकामे नियमितीकरणातील जाचक अटी रद्द करणे, संपूर्ण शास्तीकर आणि रिंग रोड रद्द करण्याबाबत राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे. अंत्यविधीचा खर्चाचा ठराव महापालिकेने केला आहे. त्याची तत्काळ कार्यवाही करण्याची सूचना आयुक्तांना देण्यात येईल, असे आश्‍वासन महापौर  काळजे यांनी दिले. त्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आल्याचे मारुती भापकर यांनी सांगितले. संबंधित मागण्या दोन महिन्यांत पूर्ण न झाल्यास 20 मार्चपासून आंदोलन व्यापक करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. दरम्यानच्या कालावधीत या प्रश्‍नांवर जनजागृती केली जाणार आहे. 

शहरात प्रथमच सर्वपक्षीय आंदोलन

शहरात आतापर्यंत विविध आंदोलन झाली आहेत. सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यर्त्यांचा समावेश असलेले हे प्रथमच आंदोलन झाल्याचा दावा कार्यकर्त्यांनी केला आहे. या आंदोलनास संदर्भात महापौर नितीन काळजे व सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी पत्र दिले आहे.