Fri, Apr 26, 2019 17:28होमपेज › Pune › पत्रकार गौरी लंकेश हत्याप्रकरण ; सनातनच्या चार साधकांना अटक

सनातनच्या चार साधकांना अटक

Published On: Jun 02 2018 10:33AM | Last Updated: Jun 02 2018 1:11PMपिंपरी : प्रतिनिधी 

बंगळूर येथील ‘लंकेश पत्रिका’ या साप्ताहिकाच्या संपादक गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी विशेष तपास पथकाने (एसआयटी) चौघांना अटक केली आहे. ते सनातन संस्था व हिंदू जनजागृती समितीशी संबंधित असल्याचेही पोलिस यंत्रणांकडून सांगण्यात येत आहे. या चौघांनी एका लेखिकेच्या हत्येचा कट रचल्याचेही चौकशीतून समोर आले आहे. गतवर्षी 5 सप्टेंबर रोजी बंगळूरमधील आर. आर. नगरमध्ये घराबाहेर त्यांच्यावर गोळ्या झाडून गौरी लंकेश यांची हत्या करण्यात आली होती. 

याप्रकरणी चार दिवसांपूर्वी के. टी. नवीनकुमार याच्याविरोधात एसआयटीने आरोपपत्र दाखल केले आहे. त्याने गोळ्या झाडणार्‍यांना लंकेश यांच्या घरापर्यंत पोहोचवणे व मार्गदर्शन करण्याची भूमिका बजावल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे. 

त्यानंतर या हत्या प्रकरणात सुजित कुमार, अमोल काळे ऊर्फ भाईसाहेब ऊर्फ संजय भन्सारे (39, रा. माणिक कॉलनी, चिंचवडगाव,  पुणे), अमित डेगवेकर ऊर्फ प्रदीप महाजन (28, रा. कळणे, ता. दोडामार्ग, जि. सिंधुदुर्ग, सध्या रा. फोंडा, गोवा), मनोहर येडावे ऊर्फ मनोज (28) या चार संशयितांना गुरुवारी एसआयटीने ताब्यात घेतले. त्यामुळे लंकेश हत्या प्रकरणाचे पिंपरी-चिंचवड ‘कनेक्शन’ समोर येत आहे. अटक केलेल्या चार संशयितांपैकी अमोल हा चिंचवडमधील सनातनचा सक्रिय साधक आहे.

अमोलकडे मोबाईल लायब्ररी, प्रचारात्मक वाहनांची जबाबदारी

अमोल काळे 15 वर्षांपासून चिंचवड लिंकरोड येथे आपल्या कुटुंबासह राहत आहे. त्याच्या कुटुंबामध्ये वृद्ध आई, पत्नी आणि चार वर्षीय मुलगा आहे. चार-पाच महिन्यांपूर्वी त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला. अमोल आणि त्याचे कुटुंब हे एक शांत कुटुंब म्हणून ओळखले जाते. त्यांचा राहत असलेल्या ठिकाणी कोणाशीही संवाद नसे. अमोल अत्यंत कमी काळ म्हणजेच सलग दहा दिवसांपेक्षा जास्त काळ घरी राहत नसे. त्याच्याजवळ सनातन आणि हिंदू जनजागृती समितीच्या प्रचारात्मक गाड्या, मोबाईल लायब्ररी असल्याची माहिती समोर आली आहे. 

21 मे रोजी अमोल ऊर्फ भाईसाहेब आणि त्यांच्या तीन सहकार्‍यांना कर्नाटक पोलिसांनी गोवा-कर्नाटक सीमेवर नाकाबंदीच्या वेळी ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडे हत्यारे आढळल्याने पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्यांनी लेखक एस. भगवान यांची हत्या करण्याचा कट रचल्याची माहिती मिळाली. 

गौरी लंकेश यांच्या हत्येची महत्त्वाची माहिती पोलिसांना पोलिस  कोठडीत मिळाल्यानंतर 31 मे रोजी एसआयटीने त्यांना ताब्यात घेतले. त्यांना 11 जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवले आहे. या चार जणांकडे 43 पेक्षा अधिक मोबाईल सिम मिळाली आहेत. याचबरोबर ते विविध प्रकारच्या संशयास्पद हालचालींमध्ये सहभागी असल्याचे पोलिसांना आढळून आले आहे. 

पुणे पोलिस आयुक्‍तालयातील परिमंडल तीनचे पोलिस उपायुक्‍त गणेश शिंदे यांच्या माहितीनुसार त्या आरोपींना बेकायदेशीर पिस्तूल आणि हत्येसाठी कट रचल्याबद्दल कर्नाटकात अटक करण्यात आले. त्यापैकी अमोल काळे चिंचवड येथील रहिवाशी असून, तो अधिक वेळ कर्नाटकात राहात होता.   

दरम्यान, आमचा दोडामार्ग वार्ताहर कळवितो की, सनातनचा साधक असलेला अमित डेगवेकर हा दोडामार्ग तालुक्यातील कळणे गाव येथील मूळ रहिवाशी आहे. याला अटक केल्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. कळणे या गावी त्याचे आई, वडील, दोन भाऊ राहतात. त्याचे प्राथमिक शिक्षण गावीच झाले. त्यानंतर गोवा-फोंडा येथे पुढील शिक्षण झाले. सध्या तो फोंडा येथेच वास्तव्यास आहे.