Mon, Jun 24, 2019 17:28होमपेज › Pune › सर्वेक्षणात दीड हजार मिळकतींचा शोध

सर्वेक्षणात दीड हजार मिळकतींचा शोध

Published On: May 22 2018 1:16AM | Last Updated: May 22 2018 1:12AMपिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर संकलन विभागाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी घरोघरी जाऊन मिळकतींची पाहणी केली. महिन्याभर झालेल्या या सर्वेक्षणात 1 हजार 455 नव्या मिळकतींचा शोध लागला आहे. त्यामुळे पालिकेच्या उत्पन्नामध्ये लाखो रुपयांची भर पडणार आहे.  अधिनियमातील अनुसूची ‘ड’ प्रकरण 8 मधील नियम 5 नुसार मिळकतधारकांनी नवीन, वाढीव बांधकाम केल्यास तसेच जुन्या मिळकतीच्या वापरात बदल केल्याच्या दिनांकापासून 15 दिवसाच्या कालावधीत पालिकेस कर आकारणी योग्य कागदपत्रांसह अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. तथापि, बहुतांश मिळकतधारक कर आकारण्यासाठी अर्ज करत नाहीत. त्यामुळे पालिकेचे मिळकतकराच्या रूपात मिळणारे उत्पन्न बुडत आहे.  

हे टाळण्यासाठी पालिकेच्या 16 करसंकलन विभागीय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचार्‍यांच्या 136 पथकाद्वारे घरोघरी जाऊन मिळकतीची पाहणी करण्यात आली. त्यात नवी मिळकत, जुन्या बांधकामांत वाढीव बांधकाम आणि घरगुती वापराचा व्यापारी मिळकतीमध्ये बदल यांची माहिती घेण्यात आली. हे सर्वेक्षण 16 एप्रिल ते 15 मे असे एक महिना कालावधीत पूर्ण करण्यात आले. त्यामध्ये एकूण 1 हजार 455 नव्या, वाढीव व वापरात बदल केलेल्या नव्या मिळकतींचा शोध लागला आहे. 

या नव्या मिळकतींची कर संकलन कार्यालयाकडे नोंद करण्यात येऊन, त्याच्या एकूण क्षेत्रफळानुसार कर आकारणी सुरू केली जाणार आहे. त्यामुळे पालिकेच्या तिजोरीत लाखो रूपयांची भर पडणार आहे. दरम्यान, शहरात मोठ्या प्रमाणात उन्हाळा असल्याने सर्वेक्षणात अडचणी निर्माण झाल्या. संबंधित पथकाकडून आपल्या भागात नव्या मिळकती नसल्याचे प्रमाणपत्र घेण्यात आले आहे. या संदर्भात पालिकेचे अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे यांनी सांगितले की, कर संकलन विभागातील अधिकारी व कर्मचार्‍यांचे पथक करून शहरात मिळकतींची पाहणी करण्यात आली. त्यात सुमारे दीड हजार नव्या, वाढीव आणि वापर बदल्याच्या मिळकती आढळून आल्या आहेत. त्यांना नियमानुसार कर आकारणी केली जाणार आहे. 

शहरातील मिळकतींचा सॅटेलाईटद्वारे शोध

महापालिकेने उत्पन्नाचे स्त्रोत वाढवून आपला ‘आर्थिक’ कारभार सक्षम करण्याचे निर्देश राज्य शासनाने वारंवार दिले आहेत. त्या दृष्टीने पिंपरी-चिंचवड पालिकेतर्फे विविध पावले उचलण्यात येत आहेत. त्या अंतर्गत शहरातील मिळकतींचे सॅटेलाईटद्वारे सर्वेक्षण करून नोंद नसलेल्या मिळकतींचा शोध घेण्यात येणार आहे. या कामासाठी खासगी एजन्सीची नेमणूक केली जाणार आहे. संगणक प्रणालीद्वारे या कामांचा आराखडा तयार केला जात आहे. लवकरच या कामाची निविदा प्रक्रिया राबवून प्रत्यक्ष काम सुरू केले जाईल. सॅटेलाईट सर्वेक्षणातून मिळकतींची संख्या दुप्पटीने वाढण्याची शक्यता आहे.