Fri, Jul 19, 2019 20:00होमपेज › Pune › ‘वन अबव्ह पब’ आयटी पार्कमध्येही घडू शकते!

‘वन अबव्ह पब’ आयटी पार्कमध्येही घडू शकते!

Published On: Apr 09 2018 1:31AM | Last Updated: Apr 09 2018 1:09AMपुणे : विजय मोरे

शहर पोलिसांना पैसे खाण्याचा लागलेल्या ‘भस्म्या रोगाची’ लागण आता थेट उपनगरातही सुरू झाली आहे. हिंजवडी, सांगवी येथील मॉलच्या टेरेसवरच सर्रासपणे हुक्का पार्लर, पब आणि हॉटेल्स बेकायदेशिरपणे चालविली जात असून, शनिवार-रविवारी तरुण-तरुणींची याठिकाणी होणारी प्रचंड गर्दी, तसेच कोणत्याही प्रकारच्या सुरक्षिततेविषयी असणारी साशंकता यामुळे केव्हाही या ठिकाणी मुंबईतील कमला मिल्स आवारात ‘वन अबव्ह पब’ मध्ये झालेल्या अग्नितांडवाप्रमाणे धोका होण्याची शक्यता आहे.

शहर पोलिस दलाच्या हद्दीत असलेल्या हिंजवडी, सांगवी या उपनगरातील पोलिस ठाण्याच्या अंतर्गत अनेक आय. टी. कंपन्या आहेत. या कंपन्यांमध्ये कार्यरत असणारे सर्वच तरुण-तरुणी आहेत. विशेष म्हणजे दर शनिवार-रविवारी ‘खाओ-पिओ ऐश करो’ याच मनमौजीत हा व्हाईट कॉलर वर्ग दोन दिवस केवळ ऐश आणि ऐशच करीत असतो.

या व्हाईट कॉलर तरुण-तरुणींच्या खिशात खुळखुळणारा लाखोंचा पैसा कॅश करण्यासाठी या परिसरात अनेक मॉल, हॉटेल, पब, हुक्का पार्लर मोठ्या प्रमाणावर सुरु झाले आहेत. शहरातील एकूण 54 हुक्का पार्लरपैकी सुमारे 25 हुक्का पार्लर बेकायदेशिरपणे या परिसरात चालविले जातात. तरुण-तरुणींमध्ये वाढलेल्या व्यसनाधिनतेमुळे हुक्का पार्लर म्हणजे हुकमी ठिकाणे ठरली आहेत.

शहरात हुक्का पार्लर, मसाज पार्लरची संख्या प्रत्येकी 54 आहे. शहर पोलिसांसाठी हा आकडा कदाचित लकी असावा!  बेकायदेशिरपणे हे धंदे चालत असतानाच, या परिसरातील अनेक मॉल्सच्या टेरेसवर पब आणि हॉटेल्स मोठ्या प्रमाणावर सुरु आहेत. या ठिकाणी सुट्टीच्या दोन दिवसांत हजारोंच्या संख्येने तरुणाईची हुल्लडबाजी पहाटेपयंत सुरु असते. या प्रतिनिधीने रात्रीचे हिंजवडी पाहण्यासाठी येथील काही पब, हुक्का पार्लरला भेट दिली. तेंव्हा याठिकाणी सुरक्षिततेसंदर्भात प्रचंड अनागोंदी कारभार असल्याचे दिसून आले. 

या संदर्भात एका वरिष्ठ पोलिस अधिकार्‍याने सांगितले की, येथील परिस्थिती पाहता 29 डिसेंबर 2017 रोजी मध्यरात्री झालेले कमला मिलमधील अग्नीतांडव दृष्य समोर येते. तेथील लागलेल्या आगीत 15 जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. तेथेही ‘वन अबव्ह पब’मध्ये आग लागली होती. तर मृत्युमुखी पडलेल्यामध्येही तरुणाईच होती. हिंजवडी, पिंपळे सौदागर येथील मॉलच्या टेरेसवर बेकायदेशिरपणे चालविले जाणारे हॉटेल्स, पब आणि हुक्का पार्लरमध्येही तरुणाईची हुल्लडबाजी पहावयास मिळते. पंरतु टेरेसवर चालणार्‍या पार्टीत अपघाताने अग्नितांडव झाले तर त्याची भयानकता भीषण असणार आहे. पण पैसा खाण्याचा लागलेल्या भस्म्या रोगामुळे पोलिस अधिकार्‍यांच्याच संगनमताने हे अवैध धंदे उघडपणे सुरु आहेत, हे दुर्दैवी वास्तव असल्याचे बोलले जाते.

 

Tags : pune, pune news, One Even Pub, IT Park,