Thu, Sep 19, 2019 03:36होमपेज › Pune › युतीची पुन्हा बाजी की आघाडीचा दे धक्‍का...

युतीची पुन्हा बाजी की आघाडीचा दे धक्‍का...

Published On: May 23 2019 1:44AM | Last Updated: May 23 2019 1:55AM
पुणे : प्रतिनिधी

अत्यंत चुरशीच्या लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील पुणे, बारामती, शिरूरसह, मावळमध्ये कोण बाजी मारणार ते आज स्पष्ट होणार आहे. भाजप-शिवसेना युती जिल्ह्यात पुन्हा वर्चस्व गाजविणार की, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी युतीला धक्का देणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. काही मतदारसंघांत धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

पुणे जिल्ह्यात पुण्यासह बारामती, मुळशी आणि मावळचा काही भाग असे लोकसभेचे चार मतदारसंघ आहेत. मावळ आणि शिरूर शिवसेनेकडे तर पुणे भाजपकडे अशा युतीकडे तीन जागा असून, राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीकडे केवळ बारामतीची एक जागा आहे. या लोकसभा निवडणुकीत मावळ आणि शिरूरची जागा खेचून आणण्यासाठी राष्ट्रवादीने ताकद पणाला लावलेली होती. दुसरीकडे कोणत्याही परिस्थितीत बारामतीची जागा जिंकायची असा चंग भाजपने बांधला होता. पुण्याची जागा पुन्हा भाजपकडून खेचून आणण्यासाठी काँग्रेसनेही ताकद पणाला लावली होती. जिल्ह्यातील चारही जागांवरची निवडणूक अशी अत्यंत अटतटीची झालेली आहे.

पुण्यात भाजपकडून पालकमंत्री गिरीश बापट आणि काँग्रेसकडून माजी आमदार मोहन जोशी यांच्यात सरळ सामना रंगला. अखेरच्या टप्यात प्रचारात आरोप-प्रत्यारोपाची धुराळा उडाला. मात्र, प्रत्यक्ष मतदानात पुण्याचा टक्का घसरला. 49.84 टक्के इतकी मतदानाची नोंद झाली. त्यामुळे हा घसरलेला टक्का कोणाला धक्का देणार आणि बापट यांना दिल्लीत जाण्याची संधी मिळणार की जोशी त्यांची संधी हुकविणार, याकडे पुणेकरांचे लक्ष आहे.

बारामतीची निवडणूक यावेळेस अत्यंत चुरशीची झाली. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन यांना निवडणुकीत उतरवून भाजपने सुळेंनाच नाही तर थेट पवारांनाच आव्हान दिले. बारामती आम्ही जिंकणारच, असे थेट मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. बारामतीत 61.54 टक्के इतक्या मतदानाची नोंद झाली. त्यामुळे आता खरोखरच बारामती जिंकून भाजप इतिहास घडविणार का, याकडे केवळ राज्याचेच नाही तर देशाचे लक्ष लागले आहे.

मावळमध्ये राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ रिंगणात असून त्यांनी शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांच्यापुढे आव्हान उभे केले आहे. मावळची निवडणूक अजित पवारांनी प्रतिष्ठेची केली आहे. स्वत: पवारांबरोबरच पार्थ यांच्या राजकीय भवितव्याचा फैसला येथील निकालातून लागेल. मावळचा गड त्यामुळे कोण जिंकणार याबाबत मोठी उत्सुकता नसली तरच नवल. या मतदारसंघात 59.49 टक्के इतके मतदान झाले होते.

शिरूरमध्ये सलग तीन टर्म खासदार असलेल्या शिवसेनेच्या शिवाजीराव आढळराव यांच्यापुढे पहिल्यांदाच राष्ट्रवादीने अमोल कोल्हे यांच्या रुपाने मोठे आव्हान उभे केले आहे. रुपेरी पडद्यावर संभाजी महाराजांची भूमिका साकारणार्‍या कोल्हेंनी प्रचारात चांगलीच रंगत आणली. शिरूरची जनता अभिनेत्याला नेता करणार की आढळराव खासदारकीचा चौकार मारणार हेच बघायचे आहे.