Wed, May 22, 2019 14:27होमपेज › Pune › सहकारी साखर कारखान्यांची खासगी कारखान्यांवर सरशी 

सहकारी साखर कारखान्यांची खासगी कारखान्यांवर सरशी 

Published On: May 28 2018 1:38AM | Last Updated: May 28 2018 12:35AMपुणे : प्रतिनिधी

राज्यातील ऊस गाळप हंगामाची सांगता झाली असून यंदा सहकारी साखर कारखान्यांनी ज्यादा दिवस गाळपात खासगी कारखान्यांवर मात केली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील मुळा सहकारी साखर कारखाना सर्वाधिक म्हणजे 204 दिवस सुरू राहिला. जादा दिवस हंगाम चालविण्यात नगरमधील 4, सातारा एक, पुणे दोन, जालना दोन आणि नांदेड जिल्ह्यातील एका कारखान्याचा समावेश आहे. या यादीत एकही खासगी कारखाना नाही. याशिवाय ऊस पट्ट्यातील प्रामुख्याने कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील कारखानेही या यादीत नाहीत.  

ऊस गाळप हंगाम सरासरी 160 ते 180 दिवसांचा अपेक्षित राहतो. त्यापेक्षा 20 ते 25 दिवस काही कारखान्यांनी हंगाम घेतल्याचे स्पष्ट झालेले आहे. मुळा (नगर) 204 दिवस, श्री ज्ञानेश्वर (नगर) 200, सह्याद्री (सातारा) 199,  अशोक (नगर) 199, विघ्नहर (पुणे) 192, भाऊराव चव्हाण (नांदेड) 192, वृध्देश्वार (नगर) 190, माळेगांव (पुणे) 182,  समर्थ युनिट 2 (जालना) 182, समर्थ 180 दिवस असा हंगाम चालविला गेला.

राज्यात हंगाम 2017-18 मध्ये 101 सहकारी आणि 86 खाजगी मिळून एकूण 187 कारखान्यांनी ऊस गाळप हंगाम घेतलेला आहे. त्यातून 952.47 लाख टन उसाचे गाळप पूर्ण झालेले आहे. तर 11.24 टक्के सरासरी उतार्याातून 107 लाख टन साखरेचे उत्पादन हाती आलेले आहे.  

कारखाने सरासरी 160 ते 180 दिवस चालणे अपेक्षित मानले जाते. मात्र, त्यापेक्षाही अधिक दिवस काही कारखाने चालल्याने त्यांची पूर्ण कार्यक्षमता वापरात आली. कारखान्यांचा अतिरिक्त खर्च कमी होऊन उत्पादन खर्च कमी होण्यास हातभार लागण्याची अपेक्षा आहे. राज्यात विक्रमी ऊस गाळप आणि उच्चांकी साखर उत्पादन होण्यासही त्याचा फायदा झाला आहे.    - संजय खताळ, व्यवस्थापकीय संचालक, राज्य सहकारी साखर कारखाना संघ.