Tue, Aug 20, 2019 04:08होमपेज › Pune › शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ‘फोर्ट डे’

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ‘फोर्ट डे’

Published On: Jun 01 2018 2:11AM | Last Updated: May 31 2018 11:46PMपिंपरी : प्रतिनिधी

शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून 5 जून रोजी महाराष्ट्रात ‘फोर्ट डे’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी ज्या शिवभक्तांना राज्याभिषेक सोहळ्याला रायगडावर उपस्थित राहता येणार नाही त्यांनी आपल्या जवळच्या किल्ल्यांवर जाऊन  स्वच्छता करावी आणि महाराष्ट्रातील सर्व गड किल्ले प्लास्टिक व कचरामुक्त करावेत, असे आवाहन छत्रपती संभाजी राजे यांनी केले असल्याची माहिती शिवराज्याभिषेक समितीचे पिंपरी-चिंचवड समन्वयक विश्वास काशिद यांनी केले.

किल्ले रायगड येथे शिवराज्याभिषेक सोहळ्याची जय्यत तयारी सुरु आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी हा दिवस ‘फोर्ट डे’ म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले आहे. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त 5 व 6 जून रोजी विविध किल्ले रायगडावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दि.5 जून रोजी सकाळी सात वाजता चित्त दरवाजापासून रायगड स्वच्छता मोहिमेस सुरुवात होईल. होळीचा माळ येथे दुपाारी बारा वाजता मोहिमेचा समारोप होईल, दुपारी साडेबारा वाजता अन्नछत्राचे उद्घाटन होईल. 

दुपारी साडे तीन वाजता युवराज संभाजीराजे छत्रपती व शहाजीराजे छत्रपती यांचे चित्त दरवाजा येथे स्वागत होईल. येथून ते शिव भक्तांसमवेत पायी गड चालण्यास सुरुवात करतील. साडे चार वाजता गडपूजन, सहा वाजता रायगडावरील उत्खननात मिळालेल्या साहित्याच्या प्रदर्शनाचे उद्घाटन युवराज संभाजीराजे यांच्या हस्ते होणार आहे. साडेसहा वाजता, मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक, सात वाजता शाहिरी कार्यक्रम, रात्री आठ वाजता संभाजीराजे यांचा थेट शिवभक्तांशी संवाद होईल. साडेआठ वाजता, गडदेवता शिरकाईचा गोंधळ, रात्री नऊ वाजता कीर्तन, जागर व ही रात्र शाहिरांची हा कार्यक्रम होणार आहे. 

दुसर्‍या दिवशी दि.6 जून रोजी सकाळी सहा वाजता ध्वजपूजन,  शाहिरी कार्यक्रम, साडेनऊ वाजता शिवाजी महाराजांच्या पालखीचे आगमन होणार आहे. पावणे दहाच्या सुमारास युवराज संभाजीराजे छत्रपती व शहाजीराजे छत्रपती यांचे स्वागत व मिरवणुकीने राजसदरेकडे रवाना करण्यात येईल. दहा वाजून दहा मिनिटांनी संभाजीराजे यांच्या हस्ते शिवरायांच्या अभिषेकाला सुरुवात होईल. मेघडंबरीतील शिवाजी महाराजाना सुवर्ण नाण्यांचा अभिषेक घालण्यात येईल. अकरा वाजता पालखी सोहळ्याला सुरुवात होईल. दुपारी बारा वाजता शिवरायांच्या समाधीला पुष्पहार अर्पण करुन सोहळ्याची सांगता होईल.   

रायगडावर स्वच्छता मोहीम

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त यंदा प्लॅस्टिक व कचरामुक्त मोहीम हाती घेण्यात आली आहे. किल्ले रायगडावर व्यापक स्वरूपात ही मोहीम राबवण्यात येणार आहे. तथापि, ज्या शिवभक्तांना या सोहळ्याला उपस्थित राहता येणार नाही. त्यांनी जवळच्या गड, किल्ल्यांची स्वच्छता करण्याचे आवाहन छत्रपती संभाजी महाराज यांनी केले आहे. त्यानुसार, शिवराज्याभिषेक समितीच्या नेतृत्वाखाली पिंपरी-चिंचवडमधील कार्यकर्ते लगतच्या मावळ व परिसरातील गड-किल्ल्यांवर स्वच्छता मोहीम राबवून शिवरायांना मानवंदना देणार असल्याचे विश्वास काशिद यांनी सांगितले.