Mon, Jun 24, 2019 21:16होमपेज › Pune › कागदावरील रस्ते, उड्डाणपूल, बोगदे होणार प्रत्यक्षात

कागदावरील रस्ते, उड्डाणपूल, बोगदे होणार प्रत्यक्षात

Published On: Feb 28 2018 1:13AM | Last Updated: Feb 28 2018 12:32AMपुणे : प्रतिनिधी

शहरातील वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असल्याने, ती सोडविण्यासाठी महापालिकेच्या पुढील वर्षाच्या अंदाजपत्रकात रस्ते, उड्डाणपूल, बोगदे, वाहनतळ यांना प्राधान्य देण्यात आले आहे. या प्रकल्पांसाठी तब्बल 225 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लागू शकणार आहेत.

पुणे शहरातील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यावर उपाययोजना म्हणून महापालिकेने विविध प्रकल्प हाती घेतले आहेत; मात्र कधी प्रशासकीय प्रक्रियेत, तर कधी निधीअभावी हे प्रकल्प कागदावरच राहिले; मात्र स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या प्रकल्पांना आता गती देण्यासाठी निधीचा डोस दिला आहे. त्यामुळे हे प्रकल्प मार्गी लागू शकणार आहेत. 

सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महत्त्वाकांक्षी ठरू शकणारा तळजाई टेकडी ते सिंहगड रस्ता हा बोगदा अनेक वर्षे कागदावर आहे. मात्र, या अंदाजपत्रकात त्यासाठी 2 कोटींची तरतूद करून त्यास पुन्हा मूर्त स्वरूप देण्यासाठी पावले उचलली गेली आहेत. बालभारती ते पौड रस्ता अनेक वर्षे प्रतीक्षेत आहे. आता विकास आराखड्यात हा रस्ता दर्शविण्यात आला आहे. त्यासाठी सल्लागार नेमण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली आहे. या रस्त्यासाठी 2 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय सिंहगड रस्त्यासाठी राजाराम पूल ते फनटाईम चित्रपटगृहापर्यंत उड्डाणपूल प्रस्तावित करण्यात आला आहे. याशिवाय गेली अनेक वर्षे रखडलेल्या एचसीएमटीआर मार्गासाठी सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू केली आहे; तसेच  औंध-सांगवीला जोडणार्‍या मुळा नदीवर पुलासाठी 5 कोटी 84 लाख, हडपसर काळेपडळ-रामटेकडी येथे भुयारी मार्गासाठी 5 कोटी 84 लाख व शहरातील कामे सुरू असलेल्या उड्डाणपूल आणि भुयारी मार्गासाठी 3 कोटी 23 लाख अशी तरतूद करण्यात आली आहे.