Wed, Sep 19, 2018 10:35



होमपेज › Pune › राष्ट्रवादीकडून आयुक्तांना डास मारण्याची ‘बॅट’ भेट

राष्ट्रवादीकडून आयुक्तांना डास मारण्याची ‘बॅट’ भेट

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा





पिंपरी ः प्रतिनिधी

सांगवी-पिंपळे गुरव भागात डासांचा उपद्रव वाढला असून या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी आज राष्ट्रवादीच्या वतीने आयुक्त श्रावण हर्डीकर यांना डास मारण्याची बॅट भेट देण्यात आली. 

महापालिकेकडून मुळा आणि पवना नद्यांची साफसफाई होत नाही. गटरांची कामे अर्धवटच राहिल्याने परिसरात डासांचे साम्राज्य वाढले आहे. नागरिकच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीच दखल घेतली जात नसल्यामुळे राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक अतुल शितोळे आणि राजेंद्र जगताप यांच्या नेतृत्वाखाली परिसरातील नागरिकांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना भेटून डास मारण्याची बॅट भेट दिली.

आयुक्त  हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुळा आणि पवना नदीची साफसफाई होत नाही. गटरांच्या अर्धवट कामामुळे या परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. मलेरिया सारख्या आजाराने डोके वर काढले आहे. याला महापालिकेचा आरोग्य विभाग जबाबदार आहे. केंद्र आणि राज्य सरकारने  स्वच्छ भारत अभियान राबविले आहे. लाखो रुपये जाहिराती, फलकबाजी, पत्रकबाजी यासाठी खर्च केले आहेत. मात्र स्वच्छता झालेली नाही. मुळा आणि पवना नदीमध्ये आज ही कारखान्याचे रासायनिक पाणी मिसळत आहे. भूयारी गटार योजनेचे काम पूर्ण न झाल्याने मैला आणि सांडपाणी थेट पवना नदीत सोडण्यात येत आहे. यामुळे अनेक वेळा मासे मेल्याचेही आढळून आले आहे. नदीतील जीवनसृष्टी यामुळे नामशेष होण्याचा मार्गावर आहे.

सांगवी  आणि पिंपळेगुरव ही दोन्ही गावे नदीकाठी आहेत. चंद्रमणीनगर, एस. टी. कॉलनी या भागात नदीतील पाण्यात दुर्गंधी पसरलेली आहे. डासांचे साम्राज्य वाढल्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी धुरिकरण आणि रासायनिक पावडर वापरली जाते. मात्र सांगवी-पिंपळेगुरव परिसरात याचा याचा कधीच वापर केला जात नाही. मग हा खर्च केवळ कागदोपत्री दाखविला जातो का? असा सवाल करण्यात आला आहे.नदी सुधार प्रकल्पाला गती देण्याची आवश्यकता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वच्छ भारत अभियान हे स्वप्न आहे. त्यामुळे आपण स्वच्छतेकडे गांभीर्याने पहा गटाराची कामे पूर्ण करून नदी स्वच्छ करण्याचे कार्य हाती घ्या. असे निवेदनात म्हटले आहे.






  •