होमपेज › Pune › ‘माझ्यामुळे देशात आठ कायदे झाले’

‘माझ्यामुळे देशात आठ कायदे झाले’

Published On: Feb 22 2018 1:23AM | Last Updated: Feb 22 2018 1:23AMइंदापूर : प्रतिनिधी

लोकपालसाठी दि. 23 मार्चला नवी दिल्ली येथे रामलीला मैदानावर उपोषणाला बसणार आहे.  त्या आंदोलनात देशातील लाखो लोक सामील होणार आहेत. या आंदोलनात मी ‘करेंगे या मरेंगे’ या भूमिकेने मागणी मान्य झाल्याशिवाय उठणार नाही, असा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केंद्र सरकारला दिला आहे. इंदापूर येथे माहिती सेवाभावी संस्थेच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन न्यासाच्या संयुक्‍त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात अण्णा हजारे बोलत होते.  माहिती सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप लगड, गुलाबराव पाटील व नानासाहेब पवार यानी अण्णांचा सत्कार केला. 

दिल्लीत होणार्‍या या आंदोलनासाठी जनजागृती व्हावी व लाखो लोक यामध्ये सामील व्हावेत यासाठी ओडिशा राज्यातून सभा घेण्यास सुरुवात केली असून मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, तमिळनाडू, कर्नाटक, हरियाना, राजस्थान, पंजाब, अरुणाचल प्रदेशमध्ये सभा घेतल्या आहेत. परवा पुन्हा दौर्‍यावर जाणार असून राजस्थानमध्ये पुन्हा जाऊन सभा घेणार आहे व देशाच्या इतर अनेक राज्यात सभा घेणार आहे. माझ्या मोठमोठ्या सभा देशात झाल्या. परंतु त्याची बातमी चॅनेलवर किंवा वृत्तपत्रात येत नाही. सरकार बातम्या दाबत आहे. परंतु एक दिवस त्यांना याचा जाब द्यावाच लागणार आहे.  समाज आणि देशहितासाठी मला मरण आले तर मी माझे भाग्य समजेन, असे भावनिक उद‍्गार यावेळी अण्णांनी काढले.

माझ्यासारख्या एका फकिरामुळे देशात आठ कायदे जनतेच्या हितासाठी अस्तित्वात आले, असे प्रतिपादन करून अण्णा हजारे पुढे म्हणाले, मी राळेगण सिद्धी येथील यादवबाबा मंदिरात राहातो. माझे तेथे जेवणासाठी एक ताट, वाटी व तांब्या आहे. झोपण्यासाठी एक वळकटी आहे. माझे लग्न झाले नाही. मी गेली 45 वर्षे घरी गेलो नाही. माझ्या भावांच्या मुलांची नावे मला माहिती नाहीत. मी एक फकीर माणूस आहे. या फकिराने देशातील जनतेच्या हितासाठी सरकारकडून आठ कायदे मंजूर करून घेतले आहेत. 

प्रत्येक राज्यात कृषी मूल्य आयोग आहे. तो आयोग प्रत्येक राज्यातील शेतमालाचे दर ठरवून मंजुरीसाठी केंद्राकडे पाठवितो. परंतु केंद्रातील झारीतील शुक्राचार्य राज्याने पाठविलेल्या दरात निम्मी कपात करतात, म्हणून तर आपल्या शेतमालाला जास्त दर मिळत नाही. केंद्रात कृषिमूल्य आयोग आहे, परंतु त्याचा कारभार केंद्र सरकारच्या अखत्यारित चालतो. त्याऐवजी निवडणूक आयोगासारखा कृषी मूल्य आयोगाला स्वतंत्र दर्जा द्या, अशी मागणी आम्ही केंद्राकडे केली आहे.

त्याशिवाय शेतमालाचे दर वाढणार नाहीत, असे अण्णा म्हणाले.  अण्णा हजारे पुढे म्हणाले, साठ वर्षांवरील शेतकर्‍यांना दरमहा पाच हजार रुपये पेन्शन सुरू करण्याचे विधेयक संसदेत पडून आहे. ते त्वरित मंजूर करून पेन्शन सुरू करावी, अशी मागणी करणार आहे. घटनेत म्हटले आहे की, प्रत्येक नागरिकाला हक्क आहे, ज्याच्या घरात कुणीच नोकरीला  नाही, इतर उत्पन्नाचे मार्ग नाहीत त्याची जबाबदारी सरकारची आहे.  कार्यक्रमास इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील, करमाळ्याचे तहसीलदार संजय पवार, दौंडचे तहसीलदार बालाजी सोमवंशी, तसेच दै. ‘पुढारी’चे राजेगावचे वार्ताहर अमोल साबळे यांचा स्मृतिचिन्ह देऊन अण्णा हजारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.