Tue, Mar 26, 2019 23:53होमपेज › Pune › जुन्या भाजप पदाधिकार्‍यांचे आमरण उपोषणाचे हत्यार

जुन्या भाजप पदाधिकार्‍यांचे आमरण उपोषणाचे हत्यार

Published On: Apr 27 2018 1:08AM | Last Updated: Apr 26 2018 11:44PMपिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेंतर्गत येणार्‍या क्षेत्रीय कार्यालय सदस्य निवडीत डावलल्याने जुने (निष्ठावंत) पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नवीन कारभार्‍यांच्या विरोधात आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे. हे असेच चालत राहिले तर जुन्या कार्यकर्त्यांनी पक्षात राहावे की नाही, असा टाहो या कार्यकर्त्यांनी फोडला आहे. परंतु या उपोषणाकडे मात्र अनेक वरिष्ठ पदाधिकार्‍यांनी पाठ फिरविल्यामुळे उपोषण किती दिवस चालणार याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.

पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या समोरील चौकात अमर उपोषणाला जूने  भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी उपोषणाला बसले आहेत. त्यामध्ये भोसरी विधानसभा मा.अध्यक्ष शेखर लांडगे, मंडलाध्यक्ष अजय पाताडे, मा. मंडलाध्यक्ष संतोष तापकीर, शहर उपाध्यक्ष पोपट हजारे, दिलीप गोसावी, कामगार आघाडी अध्यक्ष संजय बढे, संतोष घुले, राजीव वायसे, बालाजी कानवटे यांसह असंख्य कार्यकर्ते याठिकाणी गुरुवारी सकाळी 9 वाजल्यापासून उपस्थित आहेत.

उपोषणाच्या जागेवर फ्लेक्सच्या माध्यमातून व्यक्तीपेक्षा पार्टी श्रेष्ठ,  जुने कार्यकर्ते सर्वच निराधार शहरातील  पार्टीला नाही कोणाचा आधार, जून्या कार्यकर्त्यांना डावलून नवीन कार्यकर्त्याना संधी देण्याच्या निर्णयाचा जाहीर निषेध करण्यात आला आहे.  जोपर्यंत जुन्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरूच राहणार, दंडेलशाही, हुकूमशाहीच्या विरोधात आवाज नेहमीच उठविणार, अशी उपोषणाला बसणार्‍या कार्यकर्त्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. 

आ. जगतापांसमोर कार्यकर्त्यांचा रोष

जुन्या कार्यकर्त्यांना डावलून नव्यांना क्षेत्रीय सदस्य निवडीत तुम्ही  संधी का दिली, असा संतप्त सवाल शहराध्यक्ष आ. लक्ष्मण जगताप यांना उपोषणकर्त्यांनी केला. कार्यकर्ते ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. वैशाली खाडे या अंकुश लांडगे यांच्या कार्यकर्त्या कशा होऊ शकतात, असा सवाल करत काहीही झाले तरी आम्ही उपोषण सोडणार नाही, अशी भूमिका घेतल्यामुळे आ. जगताप काही शब्द न देता निघून गेले.