होमपेज › Pune › अनधिकृत बांधकामांसाठी अधिकारीच घेतात लाच

अनधिकृत बांधकामांसाठी अधिकारीच घेतात लाच

Published On: Apr 21 2018 1:22AM | Last Updated: Apr 21 2018 1:21AMपिंपरी : प्रतिनिधी

शहरातील अनधिकृत बांधकामे रोखायची सोडून पालिकेच्या बांधकाम परवानगी व अतिक्रमणविरोधी पथकाचे अधिकारीच पैसे घेऊन त्या बांधकामांना प्रोत्साहन देत आहेत. त्यामुळे अनधिकृत बांधकामे वाढत आहेत. सह शहर अभियंता राजन पाटील यांच्यासह इतर अधिकार्‍यांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी करीत शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी सीसीटीव्ही कॅमेर्‍यामध्ये कैद झालेली ‘व्हीडिओ क्‍लिप’ महापौर नितीन काळजे यांच्याकडे सादर केली. त्या प्रकरणी तपास करून तात्काळ संबंधित दोषी अधिकार्‍यांवर कारवाईचे आदेश महापौरांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिले. 

पालिकेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी (दि.20) झाली. सभेच्या सुरूवातीलाच कलाटे यांनी हा मुद्दा उपस्थित केल्याने सभागृह अवाक झाले. कलाटे म्हणाले की, अनधिकृत बांधकामावर पालिकेकडून कारवाई केली जात आहे. तर, दुसरीकडे अधिकार्‍यांच्या वरदहस्तामुळे राजरोसपणे अनधिकृत बांधकामे उभी राहत आहेत. एखादे अनधिकृत बांधकाम सुरू असेल तर बीट निरीक्षक बांधकाम मालकाला पालिकेत बोलवतात. बक्कल पैसे घेऊन कारवाई टाळतात. या सर्व धक्कादायक प्रकाराचे माझ्याकडे व्हीडिओ क्‍लिप आहे. अधिकारी पैसे खातात असल्याने नगरसेवक बदनाम होत आहेत. बांधकाम विभागातील सर्वच अधिकार्‍यांना निलंबित करा, अशी मागणी त्यांनी केली. 

पैसे न दिल्यास त्या बांधकाम मालकास नोटीस दिली जाते. सर्रासपणे असा प्रकार पालिका भवनात सुरू आहे. बांधकाम परवानगी विभागातील सर्वच अधिकार्‍यांना निलंबित करा. नगर रचना विभागातही तसाच गलथान कारभार सुरू आहे. शाळा व रस्त्याचे आरक्षण बदलून देण्यासाठी पैसे घेतले जातात आणि जागा बदलून दिली जाते. नगरसेवक तेथे गेले की फाईली लपविल्या जातात, असा आरोप कलाटे यांनी केला. शहर अभियंता राजन पाटील यांच्यासह सर्वांचीच सखोल चौकशी करावी. 

या प्रकरणी समिती नेमून त्यांना निलंबत करा, अशी मागणी त्यांनी केली. राष्ट्रवादीच्या मंगला कदम म्हणाल्या की, शहरात पूर्वीची अनधिकृत बांधकामे नियमित होत नाहीत. जाचक अटीमुळे नागरिक पुढे येत नाहीत. त्यात शास्तीकरामुळे त्यांना आर्थिक भुर्दड सहन करावा लागत आहे. पैसे खाण्याचा प्रकार बांधकाम विभागातच नाही तर, अतिक्रमण विभागतही सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. हातवाडी व पथारीवाल्याकडून 1 हजार रूपयांची पावती फाडून पुन्हा धंदा करण्याचा सूचना अधिकारी देतात. त्यामुळे फेरीवाल्याची संख्या वाढली आहे. हे रोखण्यासाठी ‘हॉकर्स झोन पॉलिसी’ राबवली हवी, असा सल्ला त्यांनी दिला.सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले की, अधिकारी पैसे घेत असतील तर नक्कीच त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. भाजप पारदर्शक कारभार करत आहे. अशा प्रकाराला नक्कीच पाठिशी घालणार नाही. महापौर नितीन काळजे यांनी हा प्रकार गंभीर असून, त्याची सखोल चौकशी करण्याचे आदेश आयुक्त हर्डीकर यांना दिले. 

Tags : pimpri, Officers, take, bribe, unauthorized, constructions