Sun, May 19, 2019 14:51
    ब्रेकिंग    होमपेज › Pune › अप्पर पोलिस आयुक्तांचे कार्यालय प्रतिक्षेत

अप्पर पोलिस आयुक्तांचे कार्यालय प्रतिक्षेत

Published On: Mar 12 2018 12:53AM | Last Updated: Mar 11 2018 11:10PMपिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहरातील वाढलेली गुन्हेगारी आणि वारंवार होत असलेली स्वतंत्र पोलिस आयुक्तालयाची मागणी याला बगल मिळण्यासाठी पुणे पोलिसांनी चलाखी केल्याची चर्चा आहे. शहरात घडलेल्या घात-अपघातांची माहिती मिळाल्यावर तत्काळ घटनास्थळी पोहोचण्यासाठी पुणे पोलिसांच्या आयुक्तालयातील नियंत्रणकक्षाची विभागणी करण्यात आली असल्याचे 21 सप्टेंबरला जाहिर केले होते. यानंतर तत्काळ वरिष्ठ अधिकार्‍यांची कार्यालये हलविण्यात आली. त्यामुळे आता शहरासाठी एक वरिष्ठ अधिकारी भेटणार, स्वतंत्र नियंत्रण कक्ष असणार अशी आशा नागरिक धरुन बसले. मात्र सहा महिने झाले पिंपरी-चिंचवडकरांची ही आशा पुर्ण झालेली नाही. त्यामुळे अप्पर पोलिस आयुक्तालयाचे कार्यालय अधिकार्‍याच्या प्रतिक्षेत असेच म्हणावे लागेल.

नागरिकांनी 100 नंबरला फोन केल्यावर त्यांना पोलिसांकडून तत्परतेने प्रतिसाद मिळावा, यासाठी हा निर्णय फायदेशीर ठरणार होता. या बदलामुळे अप्पर पोलिस आयुक्तांचे थेट नियंत्रण 100 नंबरवर येणार्‍या प्रत्येक कॉलवर राहणार होते. पुणे पोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्राची दोन प्रादेशिक विभागांमध्ये यापूर्वीच विभागणी करण्यात आली असून, दोन स्वतंत्र अप्पर पोलिस आयुक्तांमार्फत या विभागांवर लक्ष ठेवले जाते. यापुढे नियंत्रणकक्षाचेदेखील प्रादेशिक विभागांनुसार (रीजन कंट्रोल) कामकाज चालणार असल्याचे सप्टेंबर महिन्यात सांगण्यात आले होते. नागरिकांना यासाठी कोणताही वेगळा क्रमांक अथवा पैसे लागणार नसून, 100 क्रमांकावरच संपर्क करावा लागणार होता. 

शहराचा विस्तारलेला परिसर, वाढत्या गुन्हेगारीच्या घटना, दिवसाला नियंत्रणकक्षाला येणारे शेकडो फोन यामुळे संपूर्ण यंत्रणेवर ताण येत आहे. तसेच एखादी घटना घडल्यावर त्याठिकाणी काय-काय करावे याबाबत सूचना या नियंत्रण कक्षाकडून देण्यात येत असतात. या प्रक्रियेत बराच कालावधी जातो. कित्येकदा नागरिकांना 100 क्रमांक देखील ‘बिझी ’ लागतो. या बाबींचा विचार करता मुंबईच्या धर्तीवर ‘रिजन कंट्रोल’ ही संकल्पना अस्तित्वात आणण्याचे घोषीत केले. 

दक्षिण प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलिस आणि परिमंडळ एकचे उपायुक्त यांचे कार्यालय विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या इमारतीत होते. स्वतंत्र नियंत्रणकक्ष आणि या दोन्ही अधिकार्‍यांना पुरेशी जागा आवश्यक असल्याने या दोघांच्या कार्यालयाचे स्थलांतर करण्यात आले. 

उत्तर प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलिस आयुक्त आणि परिमंडळ तीनचे (पिंपरी-चिंचवड) उपायुक्त यांचे कार्यालय स्थलांतर करण्यात येत असल्याचे सांगितले. पोलिस उपायुक्ताच्या कार्यालयात अप्पर पोलिस आयुक्तांचे तर सहायक पोलिस आयुक्त (पिंपरी विभाग) यांच्या कार्यालयात उपायुक्त यांचे कार्यालय असणार असे ठरले. त्यानुसार त्या त्या कार्यालयात बदल, फर्निचर करण्यात आले. सहायक पोलिस आयुक्त पिंपरी यांचे कार्यालय एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या नवीन इमारतीमध्ये स्थलांतर झाले. तर उपायुक्त कार्यालयाच्या शेवटच्या मजल्यावर नियंत्रण कक्षाची यंत्रसाम्रगी बसणार हे ‘फिक्स’ झाले. त्यानुसार सर्व तयारी देखील झालेली आहे. मात्र सहा महिने झाले हे प्रत्यक्षात उतरलेले नाही.

उत्तर प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलिस आयुक्त शशिकांत शिंदे हे सेवानिवृत्त झाल्यानंतर या ठिकाणचा कार्यभार अतिरीक्त देण्यात आलेला आहे. या ठिकाणी सध्या प्रदिप देशपांडे यांच्याकडे पदभार आहे. पिंपरी येथील पोलिस उपायुक्‍त इमारतीमधील अप्पर पोलिस आयुक्तांचे कार्यालय तयार असताना देखील या ठिकाणहून कामकाज करण्यास कोणीच येत नाही. यामुळे वरिष्ठ पोलिसांनी पिंपरी-चिंचवड शहरातील वाढलेली गुन्हेगारी आणि वारंवार होत असलेली स्वतंत्र पोलिस आयुक्तालयाची मागणी याला बगल देण्यासाठी चलाखी केल्याची चर्चा सुरु आहे.