होमपेज › Pune › बोगस पासपोर्टवर वास्तव्य नायजेरीयन इसम जाळ्यात

बोगस पासपोर्टवर वास्तव्य नायजेरीयन इसम जाळ्यात

Published On: Dec 15 2017 2:46AM | Last Updated: Dec 14 2017 11:48PM

बुकमार्क करा

पिंपरी : प्रतिनिधी

दुसर्‍याच्या नावाच्या पासपोर्टवर भारतात, पुण्यातील सांगवी परिसरात वास्तव्य करणार्‍या नायजेरीयन तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.

ओकुबा किंगस्ले एबुका असे अटक केलेल्या नायजेरीयन तरुणाचे नाव आहे. तो पिंपळे गुरव परिसरात वास्तव्य करत होता. त्याने 6 ते 13 डिसेंबरदरम्यान मायदेशी जाण्याचा  प्रयत्न सुरू केला, त्या वेळी नेहमीप्रमाणे पोलिस चौकशी व पडताळणी पासपोर्ट विभाग;  तसेच स्थानिक पोलिसांनी केली. चौकशी केली असता ओकुबा याने दुसर्‍याच व्यक्तीच्या नावाच्या पासपोर्टचा वापर केल्याचे समोर आले; तसेच त्या पासपोर्टच्या व्हिसाची मुदतही संपली होती. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याच्या मैत्रिणीच्या वैद्यकीय उपचारासाठी भारतात आल्याचे त्याने सांगितले. या वेळी त्याच्या मैत्रिणीचा पासपोर्ट व व्हिसा पात्र असल्याने तिला नायजेरियाला जाण्यास परवानगी देण्यात आली; मात्र संबंधित तरुणाला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेऊन अटक केली आहे.

सांगवी, पिंपळे गुरव, औंध परिसरात परदेशी नागरिकांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात आहे. सांगवीच्या परिसरात नायजेरीयन मोठ्या संख्येने भाडेतत्त्वावर राहत आहेत. काही वर्षांपूर्वी अशाच परदेशी विद्यार्थी आणि नागरिकांच्या पार्टीवर पोलिसांनी धाड टाकून त्यांना ताब्यात घेतले. त्या वेळी या नायजेरीयन टोळक्याने पोलिसांवर दगडफेक करून तणाव निर्माण केला होता. याबरोबरच अमली पदार्थ बाळगल्याच्या संशयावरून तपासाला पोलिस आल्यानंतर पळून जात असताना, इमारतीवरून पडून एका परदेशी गुन्हेगाराचा मृत्यू सांगवी परिसरात झाला होता. यासारखे अनेक गंभीर गुन्हे त्यांच्याकडून घडलेले आहेत. त्यामुळे पोलिसांनी यावर बारकाईने लक्ष ठेवणे गरजेचे आहे.