Fri, Jul 19, 2019 05:21होमपेज › Pune › उभ्या वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा

उभ्या वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा

Published On: Mar 10 2018 2:07AM | Last Updated: Mar 09 2018 11:45PMपिंपरी : प्रतिनिधी

दिवसेंदिवस शहरातील वाहतूक कोंडीची समस्या जटिल होत असून, त्यात बेशिस्त वाहनांची भर पडत आहे. आधीच शहरात पार्किंगची समस्या वाढत असताना त्यात मुख्य रस्त्यांवर दिवसभर उभ्या राहणार्‍या अवजड वाहनांमुळे वाहतुकीची डोकेदुखी आणखीनच वाढली आहे. शहरातील विविध भागांत हेच चित्र असून, वाहतूक पोलिस मात्र याकडे काणाडोळा करीत आहेत. बेशिस्त वाहनांवर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत. 

शहरात हजारो नोकरदार नोकरीनिमित्त या मार्गावरून ये-जा करीत असतात. त्यामुळे दुचाकी व चारचाकींसह अनेक वाहनांची वर्दळ असते; परंतु बेशिस्तपणे रस्त्यावर लावण्यात आलेल्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी होते व कामाच्या ठिकाणी पोचण्यास उशीर होतो, अशी तक्रार नागरिक करीत आहेत. चिंचवड, वाल्हेकरवाडी, आकुर्डी रेल्वे स्टेशन, नवी सांगवी, यशवंतनगर आदी भागात हीच परिस्थिती असून, या उभ्या वाहनांमुळे आता गल्लीबोळातही वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. 

शहरातील विविध भागात अनेक ठिकाणी महिनोंन्महिने ट्रक; तसेच अवजड व छोटी वाहने वापराविना तशीच पडून आहेत. या वाहनांवर कोणतीही कारवाई करण्यात येत नसल्याने हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. विशेष म्हणजे मुख्य रस्त्यांवर उभ्या असलेल्या वाहनांवर कारवाई का करण्यात येत नाही, असा सवाल नागरिक करीत आहेत. 

डांगे चौक, जुनी सांगवी, फुगेवाडी परिसरातही दिवसेंदिवस वर्दळ वाढत आहे. परिसरात वाहनधारकांची संख्या वाढतच असून, अशा वाहनांवर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात येत नाही. त्यामुळे येथेही वाहतूक विस्कळीत होत आहे. वेळेअभावी वाहनधारक जागा सापडेल तिथे वाहने उभी करून निघून जात असल्याने, नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. शहरातील बसस्थानकांसमोरील रस्ता; तसेच थांब्याशेजारील रस्त्यावरही रिक्षावाले; तसेच ट्रक यांचा कब्जा असतो. यामुळे वाहतुकीला अडथळा  होत आहे. चिंचवड, कासारवाडी, नाशिक फाटा; तसेच थेरगाव, डांगे चौक आदी शहरातील विविध भागांत वाहतूक कोंडी सुरळीत करण्याची मागणी करण्यात येत आहे; परंतु याकडे संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधी जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्‍न कधी सुटणार, असा सवाल नागरिक करीत आहेत.