Fri, Jul 19, 2019 17:43होमपेज › Pune › नटसम्राट,बॅरिस्टरची पारायणं केली : नाना पाटेकर 

नटसम्राट,बॅरिस्टरची पारायणं केली : नाना पाटेकर 

Published On: May 04 2018 1:50AM | Last Updated: May 04 2018 12:19AMपुणे : प्रतिनिधी

आज विक्रमचा सन्मान करताना विक्रमसमोर वाकता येत आहे, याचा मोठा आनंद आहे. नटसम्राट माझ्या ऐवजी विक्रमने केला असता, तर एक वेगळा चित्रपट आपल्याला पाहायला मिळाला असता. विक्रम संवादामध्ये जे विराम घेतो त्यात तो खूप काही सांगून जातो. डॉक्टरांच्या (डॉ. श्रीराम लागू) नटसम्राटाची आणि विक्रमच्या बॅरिस्टरची आम्ही पारायणं केली. आता विक्रमने बॅरिस्टर बसवावे; मी त्यात काम करेल, अशी इच्छा ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी व्यक्त केली.

संवाद पुणेतर्फे ‘संवाद मराठी चित्रपट संमेलना’चे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनात ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांना किरण शांताराम यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच विक्रम गोखले यांनी नाट्य आणि चित्रपट क्षेत्रात 50 वर्षे योगदान  दिल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. त्यावेळी नाना पाटेकर बोलत होते. या प्रसंगी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, अभिनेते मनोज जोशी, राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे संचालक वामन केंद्रे, डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, किरण व्ही. शांताराम, अशोक विखे पाटील, ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर, महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणीचे सचिन इटकर, संवादचे सुनील महाजन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य राजेश पांडे उपस्थित होते. 

या वेळी राजदत्त म्हणाले, मी या क्षेत्रात काय केले, याचं नेमकं उत्तर मला सांगता येत नाही. असे पुरस्कार ऊर्जा देण्याकरिता असतात. आज नाना कुठल्याकुठे गेला, त्याला पाहताना माझी मान वर जाते. पुरस्कार ही आमची भूक असते. हा सत्कार आमच्या कलाकारांच्या जगण्याची गरज आहे. सौभाग्यवतीला मंगळसूत्र दाखविताना जो आनंद होईल, तोच आनंद मला पुरस्कार स्वीकारताना होतो. 
वामन केंद्रे म्हणाले, मराठी नाटक हे राज्याच्या बाहेर जाणे ही काळाची गरज आहे. मला मराठी नाटक करता-करता भारतीय नाटक समजलं, या नाटकाची समृद्धी कळली. मी संचालकपदी नियुक्त झाल्यावर इतर देशातील विद्यापीठांचा अभ्यास केला. त्यानंतर, 3 ते 5 हजार वर्षांपूर्वीचा इतिहास असलेल्या भारतीय नाट्यसृष्टीचे वास्तव पुढे आले. भारतीय संस्कृती समृद्ध असतानासुद्धा भारताच्या बाहेर त्याची व्याप्ती पोहोचलेली नाही. त्यावर विचार करण्याची गरज पडते. भारताची रंगभूमीवरील संस्कृती भारताबाहेर सर्व सामर्थ्याने मांडली गेली पाहिजे.