Sun, Mar 24, 2019 06:21होमपेज › Pune › पदवी प्रमाणपत्रावर असंख्य चुका 

पदवी प्रमाणपत्रावर असंख्य चुका 

Published On: Jun 13 2018 1:34AM | Last Updated: Jun 13 2018 1:34AMलक्ष्मण खोत 

विद्यापीठाद्वारे विद्यार्थ्यांना देण्यात येणार्‍या पदवी प्रमाणपत्राच्या कागदावरून अनेकदा विद्यापीठाला टीकेला सामोरे जावे लागले आहे; तसेच विद्यापीठाचा परीक्षा विभाग अनेक कारणांनी सातत्याने चर्चेत असतो. यामध्ये आणखी भर पडली आहे. याबाबत विद्यार्थ्याने दिलेल्या माहितीनुसार विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागातील विद्यार्थी असलेल्या विद्यार्थ्यांच्या पदवी प्रमाणपत्रावर विभागाचे नाव न येता ‘लॉयला कॉलेज, पुणे’ येथून पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे छापून आले आहे. अथक परिश्रम घेत मिळवलेल्या पदवीची पोचपावती असणार्‍या प्रमाणपत्रावरही चूक आढळल्याने विद्यार्थ्यांनी विद्यापीठावर नाराजी व्यक्‍त केली आहे.

याबाबत बोलताना शरद बोदगे म्हणाले की, विद्यापीठाच्या डिंसेबर महिन्यातील पदवीप्रदान समारंभासाठी नोंदणी केली होती. त्यानुसार पदवीप्रदान समारंभाच्या दिवशी विद्यापीठातून पदवी प्रमाणपत्र घेतले. दरम्यान, विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या चुकीमुळे प्रमाणपत्रावर संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागाचे (रानडे इन्स्टिट्यूट) नाव न टाकता ज्या महाविद्यालयाचे नाव कधी ऐकले नाही, अशा लॉयला कॉलेजचे नाव प्रमाणपत्रावर छापून आले आहे. विद्यापीठाने केलेल्या या नावामधील गोंधळामुळे पदवी मिळाल्याच्या आनंदावर मात्र विरजण पडले, अशी भावना बोदगे यांनी व्यक्त केली. 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पदवी मिळूनही त्या प्रमाणपत्राचा काही उपयोग नाही, अशी परिस्थिती काही विद्यार्थ्यांची झाली आहे. विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागाच्या 3 विद्यार्थ्यांच्या पदवी प्रमाणपत्रावर विभागाचे नाव चुकीचे असल्याने विद्यार्थ्यांना या प्रमाणपत्राचा वापर कोठेही अर्ज करण्यासाठी करता आला नाही. पदवी प्रमाणपत्रावर चुकीची माहिती असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, ज्या विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्रांमध्ये काही चुका असतील, त्यांनी तत्काळ विद्यापीठातील परीक्षा विभागाकडे तक्रार नोंदवावी, त्यांच्या प्रमाणपत्रावरील चुका सुधारून त्यांना नवे पदवी प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था करण्यात येईल, अशी माहिती परीक्षा विभागातील अधिकार्‍यांनी दिली.