Thu, Mar 21, 2019 11:06होमपेज › Pune › आता आंतरराष्ट्रीय वाहन परवानाही झाला ऑनलाईन

आता आंतरराष्ट्रीय वाहन परवानाही झाला ऑनलाईन

Published On: Apr 06 2018 1:29AM | Last Updated: Apr 06 2018 12:46AMपुणे : प्रतिनिधी

प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने (आरटीओ) आंतरराष्ट्रीय वाहन परवाना (आयडीपी) आता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून मिळविता येणार आहे. येत्या 9 एप्रिलपासून सारथी 4.0 प्रणालीवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी यांनी दिली.

देशातील नागरिकांना परदेशात वाहन चालविण्यासाठी आवश्यक परवाना देण्यासाठी आरटीओ कार्यालयाच्या वतीने ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येत हेाते. दरम्यान, नागरिकांना घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने आंतरराष्ट्रीय वाहन परवाना देण्यासाठी आरटीओ प्रशासनाच्या वतीने निर्णय घेण्यात आला आहे. अल्पावधीतच आंतरराष्ट्रीय वाहन परवाना ऑनलाईन पद्धतीने सुरू झाल्याने नागरिकांचा कार्यालयात येण्याचा वेळ वाचणार आहे. आरटीओ कार्यालयाच्या वतीने 2016-17 मध्ये 3 हजार 444,  तर 2017-18 मध्ये 2 हजार 921 जणांना आंतरराष्ट्रीय वाहन परवाना वितरित करण्यात आला आहे.

प्रक्रिया अशी असेल...

परदेशात वाहन चालविण्यासाठी नागरिकांना आंतरराष्ट्रीय वाहन परवाना महत्त्वाचा आहे. त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने ‘परिवहन डॉट जीओव्ही डॉट इन’ या संकेतस्थळावरून सारथी सर्व्हिसेस पर्याय निवडून अर्ज भरावा लागणार आहे. त्यानंतर प्रिंट काढून कागदपत्रांचे अपलोडिंग करावे; तसेच ऑनलाईन पद्धतीने 1 हजार रुपयांचे शुल्क भरावे लागणार आहे.

आवश्यक कागदपत्रे

नमुना 4 अ, नमुना 1 अ मधील एमबीबीएस पात्रताधारक डॉक्टरांनी जारी केलेले वैद्यकीय प्रमाणपत्र, पासपोर्ट, व्हिसा (लागू असल्यास), ड्रायव्हिंग लायसन्स, फोटो इत्यादी कागदपत्रे अर्जदारांना आवश्यक आहेत. कागदपत्रांचे अपलोडिंग केल्यानंतर मूळ कागदपत्रांसहित अर्जदाराने स्वतः आरटीओ कार्यालयात उपस्थित राहणे बंधनकारक आहे. 

 

Tags : pune, pune news, vehicle license, international vehicle license, online