Sat, Aug 24, 2019 21:12होमपेज › Pune › आता तयारी ४४ कि. मी. वर्तुळाकार मेट्रोची

आता तयारी ४४ कि. मी. वर्तुळाकार मेट्रोची

Published On: Jan 23 2018 1:25AM | Last Updated: Jan 23 2018 1:14AMपुणे : प्रतिनिधी

तब्बल दहा वर्षे कागदावर राहिलेल्या वनाज ते रामवाडी आणि पिंपरी ते स्वारगेट मेट्रोची उभारणी सुरू असतानाच, या चारही टोकांना जोडणार्‍या 44 किलोमीटर लांबीच्या वर्तुळाकार मेट्रो मार्गाची तयारी दाखवून महापालिकेच्या कारभार्‍यांनी पुणेकरांना आश्‍चर्याचा सुखद धक्का दिला आहे. प्रामुख्याने शहराच्या उपनगरांना जोडणारा हा वर्तुळाकार मेट्रो प्रकल्प राबविण्यासाठी चाचपणी अहवाल तयार करण्यात येणार आहे. तो हाती आल्यावर त्याचा ‘डीपीआर’ करण्याचे काम ‘महामेट्रोला देण्यात येणार आहे, असे महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

पानशेत प्रलयानंतर चारही दिशांना पुणे शहराची वाढ होत गेली आणि त्या वेळी सात लाखांच्या घरात असलेली लोकसंख्या पन्नास वर्षांत पाच पटींहून अधिक वाढली. सार्वजनिक वाहतूकव्यवस्था मुख्यतः‘पीएमपी’ अकार्यक्षम ठरल्याने खासगी वाहनांची संख्याही वाढत राहिली आणि गतवर्षी वाहनांच्या संख्येने शहराच्या लोकसंख्येलाही मागे टाकण्याचा ‘विक्रम’ नोंदविला. महाराष्ट्र राज्य अस्तित्वात येण्यापूर्वीच आखलेल्या ‘रिंग रेल्वे’चा प्रकल्प लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे बासनात गुंडाळला गेला. 

अशा स्थितीत वनाज-रामवाडी आणि पिंपरी-स्वारगेट मेट्रोला छेद देणार्‍या वर्तुळाकार मेट्रोची गरज महापालिकेने लक्षात घेतली असेल, तर ते सुचिन्हच मानायला हवे. तब्बल 44 किमीच्या मार्गावर ही मेट्रो धावणार असून, काम सुरू असलेले दोन्ही मेट्रो मार्ग त्यास जोडले जाणार आहेत. त्यामुळे भविष्यात मेट्रोचे जाळे उभे राहणार आहे.

महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी सोमवारी पुढील आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक सादर केले. या अंदाजपत्रकात चालू असलेल्या मेट्रो प्रकल्पाच्या हिश्श्यापोटी 12 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या वेळी आयुक्तांना शहरातील अन्य मार्गावर मेट्रो प्रकल्प राबविण्याचे नियोजन आहे का, अशी विचारणा केली असता, ते म्हणाले,की स्वारगेट ते कात्रज या मार्गावर मेट्रो प्रकल्प राबविण्यासाठी या मार्गाचा सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्याचे काम महामेट्रोला देण्यात आले आहे, त्यानुसार आता पुढील टप्प्यात शहरात वर्तुळाकार मार्गावर मेट्रो प्रकल्प राबविण्यासाठी चाचपणी अहवाल तयार करण्यात येणार आहे. मेट्रोचा हा वर्तुळाकार मार्ग वनाज ते रामवाडी आणि स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड हे जे मेट्रोचे दोन मार्ग आहेत, त्यांना जोडण्यात येणार असल्याचे आयुक्त कुमार यांनी स्पष्ट केले.