Wed, Apr 24, 2019 01:46होमपेज › Pune › पुणे-लोणावळा रेल्‍वेवर आता 'ड्रोन'ची नजर

पुणे-लोणावळा रेल्‍वेवर आता 'ड्रोन'ची नजर

Published On: Jan 20 2018 2:52PM | Last Updated: Jan 20 2018 2:52PMपुणे: प्रतिनिधी 

पुणे-लोणावळा लोकलमध्ये तरुणांकडून करण्यात येणारे स्टंट, प्रवाशांकडून बेकायदेशीररित्या ओलांडण्यात येणारा लोहमार्ग, दगड किंवा एखादी वस्तू जाणीवपूर्वक लोहमार्गावर ठेवणे, दरड कोसळणे, आदी गोष्टींवर आता ड्रोनद्वारे बारीक नजर ठेवली जाणार आहे. त्यासाठी लवकरच ड्रोन कार्यान्वित केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली. 

मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने नुकतीच काही ठिकाणांची पाहणी केली असून पुणे-सातारा लोहमार्गावरील काही मानवरहित रेल्वे फाटके, पुणे विभागातील दाट लोकवस्तीच्या काही झोपडपट्ट्या, लोणावळा घाट हे स्पॉट ड्रोनसाठी निवडण्यात आले आहेत. 

रेल्वे मंत्रालयाने देशातील रेल्वेचे सर्व झोन, सर्व विभागांमध्ये ड्रोनद्वारे देखरेख करण्याच्या सूचना दिल्या होत्या. याचाच भाग म्हणून पुणे विभागाने सप्टेंबर २०१७ मध्ये ४० लाख रुपयांचे दोन ड्रोन विकत घेतले होते. उर्वरित ड्रोन भाड्याने, विकत किंवा आउटसोर्स करण्यात येणार आहेत. फेब्रुवारीमध्ये ते कार्यान्वित करण्यात येण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले. ड्रोनद्वारे होणारे संभाव्य अपघात रोखण्यास यामुळे मदत होणार आहे. सप्टेंबर २०१७ मध्ये लोणावळा जवळील मंकी हिल येथे दरड कोसळली होती. त्यानंतर वारंवार अशा घटना तेथे घडू लागल्याने त्या घडू नयेत किंवा अशा घटना घडणार आहेत, याची पूर्वकल्पना मिळावी या करिता ड्रोनचा वापर करण्यात आला होता. आता मात्र या ड्रोनची निगराणी हवेत कायम स्वरुपी असणार आहे, असे सांगण्यात आले. मध्यंतरी ड्रोनची चाचणी घेण्यात आली व ती यशस्वीही झाली होती.                

दरम्यान, ड्रोन खरेदी करणारा पुणे विभाग देशातील पहिलाच विभाग ठरला आहे. मागील वर्षी मंकी हिल येथे घसरलेली मालगाडी असो किंवा आसनगाव येथे दरड कोसळल्याने घसरलेली दुरांतो असो, गेल्या काही महिन्यांमध्ये रेल्वे अपघातांमध्ये सातत्याने वाढ झाली आहे. त्यांना रोखण्यास सध्याचे मनुष्यबळ अपुरे पडत असून यामुळे लोहमार्गाची निगराणी करण्यास ड्रोन अत्यंत फायदेशीर ठरणार आहेत. अनुचित घटना ड्रोनद्वारे रोखल्या जाऊ शकतात, असे मत तज्ज्ञांनीही व्यक्त केले आहे.