Fri, Jul 19, 2019 19:50होमपेज › Pune › आता मोबाईल कंपन्यांच्या खोदाई शुल्कावर अधिभार !

आता मोबाईल कंपन्यांच्या खोदाई शुल्कावर अधिभार !

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

शहरात केबल टाकण्यासाठी खासगी मोबाईल कंपन्यांकडून आकारण्यात येणार्‍या शुल्कावर महापालिकेकडून अधिभार लावण्या साठी चाचपणी केली जात आहे. त्यासाठी पथ विभागाने विधी विभागाकडून अभिप्राय मागविला असून, विधीच्या अभिप्रायानंतर त्यावर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. अधिभार लावण्याचा निर्णय झाल्यास खोदाई शुल्कात मोठी वाढ होणार आहे.

मोबाईल कंपन्यांकडून शहरात ऑप्टीकल फायबर केबल टाकण्यासाठी रस्ते खोदाई केली जाते. त्यासाठी महापालिका खोदाई शुल्क व भुईभाडे घेते. पूर्वी महापालिकेकडून या खोदाईनंतर जागा भाड्यापोटी कंपन्यांकडून जे भूई भाडे घेतले होते, त्या विरोधात काही मोबाईल कंपन्यांनी न्यायालयात न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर हे शुल्क रद्द करण्यात आले होते. मात्र, पिंपरी-चिंचवड महापालिकेसह राज्यातील काही महापालिकांकडून शहरातील कंपन्यांकडून होणार्‍या खोदाईवर अधिभार आकारला जात आहे.

त्याच धर्तीवर शहरातील खासगी कंपन्यांच्या खोदाईवर हा अधिभार लावणे शक्य आहे की नाही याबाबत प्रशासनाकडून चाचपणी करण्यात येत आहे. त्यामुळे महापालिकेस खोदाई शुल्कातून कायदेशीररित्या वाढीव उत्पन्न मिळू शकणार आहे. प्रशासनाकडून हा अधिभार लावण्यासाठी पावले उचलण्यात आली असून विधीचा अभिप्राय आल्यानंतर त्यासंबधीचे चित्र स्पष्ट होऊ शकणार आहे. 

दरम्यान, महापालिकेकडून सद्यःस्थितीला खोदाईसाठी प्रती रनिंग मीटर 5500 रूपये इतके खोदाई शुल्क घेतले जाते. अधिभार लावल्यास खोदाई शुल्कात 40 ते 50 टक्के वाढ होऊ शकते, असे पथ विभागातील अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले. सध्या  हेच शुल्क पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत साडेआठ हजार रूपये इतके आहे.

 

Tags : pune, pune news, mobile companie, excavation charges, 


  •