Wed, Jul 17, 2019 20:02होमपेज › Pune › आता स्कूलबस, भाजीपाल्याची कोंडी 

आता स्कूलबस, भाजीपाल्याची कोंडी 

Published On: Jul 20 2018 1:12AM | Last Updated: Jul 20 2018 1:12AMपुणे : प्रतिनिधी

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दूध दरवाढीचे आंदोलन संपते ना संपते तोपर्यंत ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसच्या वतीने चक्‍का जाम आंदोलनाची सुरुवात आजपासून होत आहे. स्कूलबस, भाजीपाला; तसेच इतर मालाची वाहतूक पूर्णतः बंद राहणार आहे.ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्टच्या वतीने देशभरात चक्‍काजाम आंदोलन पुकारण्यात आले आहे. शहरातील बहुतांश माल वाहतूकदार संघटना, विद्यार्थी वाहतूक संघटना, मालक-चालक संघटनांनी आंदोलनास पाठिंबा दिला आहे.   

शहरात शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्‍या संघटनांची संख्या सर्वाधिक आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आरटीओ नोंदीत विविध शाळांत विद्यार्थ्यांना ने-आण करणार्‍या वाहनांची संख्या 4 हजार 160 आहे. चक्‍का जाम आंदोलनात बहुतांश संघटनांनी सहभाग नोंदविल्यामुळे विद्यार्थ्यांची वाहतूक ठप्प होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. त्यामुळे पालकांना विद्यार्थी वाहतुकीबद्दल चिंता निर्माण झाली आहे. एकीकडे दूध आंदोलन, मालवाहतूकदार संघटनेचे चक्का जाम आंदोलनाचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसणार आहे. 

स्कूलबस बंदबाबत पालक अनभिज्ञ

स्कूलबस बंदबाबत अनेक शाळांनी माहितीच दिली नसल्यामुळे पालक अनभिज्ञ असल्याचे गुरुवारी दिसून आले त्यामुळे चक्काजाम आंदोलन विद्यार्थ्यांना त्रासदायक ठरणार आहे.  आरटीओ कार्यालयाच्या नोंदीनुसार शहरातील 4 हजार 160 स्कूलबस आहेत. त्यामधील बहुतांश वाहतूकदारांनी आंदोलनात सहभाग घेतला आहे. त्यामुळे शुक्रवारी विविध शाळांतील विद्यार्थ्यांची वाहतूक बंद राहून गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे. व्हॉटस्अ‍ॅप गु्रप तसेच अ‍ॅपच्या माध्यमातून काही शाळांकडून वेळोवेळी माहिती पुरविली जाते. मात्र, आंदोलनात सहभाग घेण्याबाबत शाळा आणि स्कूलबसचालकांनी कोणतीच कल्पना न दिल्याने पालकांबाबत या ग्रुपवर विचारणा केली जात होती मात्र, त्याला कोणतेच उत्तर मिळत नव्हते. रात्री उशिरापर्यंत पालकांत संभ्रमाचे वातावरण होते. दरम्यान, आंदोलनात सहभागी न होणार्‍या वाहतूकदारांकडून आर्थिक लूट होण्याची शक्यता आहे.  विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यासाठी स्कुलबस संघटनांनी सहकार्य करण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी यांनी केले आहे. 

शहरातील काही शाळा बंद

स्कूलबसचालकांनी पुकारलेल्या बंदमुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून शहरातील काही संस्थांनी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. याबाबतचे संदेश संबंधित शाळांनी पालकांना व्हॉट्सअ‍ॅप व विविध अ‍ॅपद्वारे पाठवले आहेत. रात्री उशिरापर्यंत संदेश पाठविण्याचे काम सुरू होते. आंदोलन संपेपर्यंत शाळा बंद राहील, असेही संबंधित शाळांनी पालकांना संदेशाद्वारे सांगितले आहे.