Mon, Jun 17, 2019 04:40होमपेज › Pune › आता फुलांचे पॅकिंग कसे करायचे?

आता फुलांचे पॅकिंग कसे करायचे?

Published On: Jun 24 2018 1:34AM | Last Updated: Jun 24 2018 12:53AMपुणे : प्रतिनिधी

राज्यासह जिल्ह्यात प्लॅस्टिक बंदीच्या निर्णयाची कठोर अंमलबजावणी सुरू झाल्यावर जिल्ह्यातील फुल उत्पादक शेतकर्‍यांपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे.  जिल्ह्याच्या विविध भागातून गुलेटकडी मार्केटयार्डातील फुलबाजारात प्लॅस्टिकच्या पगमधून चाफा, जर्बेरा, गावठी गुलाब, जास्वंद आदी फुले मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी दाखल होतात. मात्र, राज्य सरकारच्या प्लॅस्टिक बाबतच्या निर्णयामुळे फुलांचा दर्जा घसरून दरात घट होण्याची शक्यता फुल उत्पादक शेतकर्‍यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. प्लॅस्टिकबंदी झाल्यामुळे फुलांच्या पॅकिंगची अडचण होणार आहे. तसेच, मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असून ते टाळण्यासाठी सरकारने मार्ग काढावा, अशी मागणी शेतकर्‍यांमधून होत आहे.

फुलबाजारात जिल्ह्यातून चाफा, जास्वंद, जर्बेरा, मोगरा, गावठी गुलाब, जुई, टगर यांसह विविध फुलांची मोठ्या प्रमाणात आवक होते. सकाळी फुलांची काढणी करून ती बाजारात विक्रीसाठी आणली जातात. त्यातील निवडक फुलांचे विक्रीसाठी पॅकिंग केले जाते. तर, बाजारात फक्त मुंबईहून टगरची फुले ही केळीच्या पानांच्या पॅकिंगमध्ये येत आहेत. याबाबत बोलताना सोनाचाफा फुलाचे उत्पादक देवराम कामठे म्हणाले, सद्यस्थितीत बाजारात चाफ्याची फुले ही प्लॅस्टीकच्या पिशव्यांमधून विक्रीसाठी आणली जातात. चाफ्याची सुटी फुले बाजारात विक्रीसाठी आणली तर येणारे जाणारे त्यातील एक एक फुल उचलून घेऊन जातील. त्यामुळे, मालाच्या वजनामध्ये घट होऊन त्याचा फटका हा शेतकर्‍यालाच बसणार आहे. याखेरीज, प्लॅस्टिकशिवाय कागद, केळीचे, पत्रावळीचे पान यांचा वापर करून पॅकिंग केल्यास त्या फुलांचा दर्जा ग्राहकांना समजणे अशक्य असून त्याचा परिणाम विक्रीवर होण्याची दाट शक्यता आहे. जास्वंदाची फुले सुट्ट्या स्वरुपात बाजारात आणली जाऊ शकतात. मात्र, फुले पॅकिंग असतील तर सुट्ट्याच्या तुलनेत जास्त दर मिळतो.

जर्बेर्‍याच्या प्रत्येक फुलाला पिशवीचे आवरण असल्याचे सांगून अतुल दांगट म्हणाले, जर्बेराचे फुल हे नाजूक असते. प्लॅस्टिकची पिशवी असल्याने ती खराब होत नाही. त्यामुळे, प्लॅस्टिक आवरण असणे आवश्यक असते. त्याऐवजी कागदी कपाचा जर्बेर्‍यासाठी वापर होऊ शकतो. मात्र, फुलांच्या तुलनेत त्याचे वजन जास्त झाल्यास त्याचा फायदा होईल असे वाटत नाही. दरम्यान, केळीच्या पान, पत्रावळी तसेच कागदांमध्ये फुले बांधणे शक्य होणार नाही. त्यामुळे, बाजारात फुले न्यायची तरी कशी, असा प्रश्‍न शेतकर्‍यांसमोर उभा राहिला आहे.