Tue, May 21, 2019 04:53होमपेज › Pune › आता प्लास्टिकचे सिलिंडर येणार

आता प्लास्टिकचे सिलिंडर येणार

Published On: Jan 19 2018 1:55AM | Last Updated: Jan 19 2018 1:02AMपुणे : नेहा सराफ 

येत्या काही दिवसांत देशातील वायू वाहतुकीत आमूलाग्र बदल होण्याची चिन्हे असून, लोखंडी सिलिंडर मागे पडून प्लास्टिक सिलिंडर बाजारात येण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे वजनाला हलकी आणि रंगीबेरंगी गॅस सिलिंडर भविष्यात बघायला मिळणार आहेत. 

भारत आणि काही विकसनशील देश सोडले तर इतर सर्व देशांमध्ये प्लास्टिक सिलिंडर वापरली जातात. कमी वजनाची, रंगबेरंगी, अधिक साठा करणारी आणि लोखंडी सिलिंडरपेक्षा अधिक सुरक्षित असलेल्या या सिलिंडरचा वापर काही दिवसांत सुरू होणार आहे. याचा प्रस्ताव 2014 सालापूर्वीच केंद्र सरकारकडे आला होता. त्यानुसार नागपूर येथे असणार्‍या मुख्य नियंत्रक कार्यालयाकडे याबाबतचा ठराव ठेवण्यात आला आहे. त्यातील बसवर वापरण्यात येणार्‍या तीन मीटर लांबीच्या टाक्यांना परवानगी मिळाली आहे, तर रिक्षा, घरगुती सिलिंडर, चारचाकी वाहने यांच्याकरिता परवानगी मिळणे बाकी असल्याचे समजते. बाजारात लवकरच येणारे प्लास्टीकचे सिलिंडर रंगीत आणि आकर्षक राहणार असून, ग्राहक त्याला निश्‍चितपणे प्राधान्य देतील.

रिक्षा वगळता क्वचित गाड्या वायुरुपी इंधन वापरतात. पेट्रोल, डिझेलपेक्षा तुलनेने स्वस्त असूनही सिलिंडर जास्त जागा व्यापत असल्यामुळे अनेकदा त्यांना पसंती मिळत नाही. त्यामुळे पैशांबरोबर पर्यावरणाचीही हानी होते. लहान गाड्यांमध्ये जागा कमी आणि गाडीचा लूक तेवढा आकर्षक नसल्याने कंपन्याही पेट्रोल टाक्यांशिवाय इतर इंधन जोडणीची रचना करीत नाहीत. मात्र, प्लास्टिकचे रंगीत आणि आकर्षक सिलिंडर आल्यावर ही अडचण सुटण्याची शक्यता आहे. सध्या घरगुती वापरात असणार्‍या सिलिंडरचे वजन 14 किलो 200 ग्रॅम आहे. ही वजनदार सिलिंडर आदळल्याने गाडीचे शॉकऑपसर खराब होतात. ती समस्याही यामुळे सुटणार आहे.

पहिला प्रयोग पुण्यात

या सिलिंडरचा पहिला प्रयोग पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या  (पीएमपीएमएल) बसमध्ये होणार असून, तसा प्रस्ताव प्रशासनाकडे ठेवला आहे. पीएमपीएमएल काही बसेससाठी सध्या वायुरूप इंधन वापरत असून, त्यातील काही बसमध्ये प्लास्टिक गॅस कंटेनर बसवून देण्याची तयारी एमएनजीएलने दाखवली आहे.