Sun, May 19, 2019 14:30
    ब्रेकिंग    होमपेज › Pune › आता मिळकतकर भरणा ‘पेटीएम’द्वारे  

आता मिळकतकर भरणा ‘पेटीएम’द्वारे  

Published On: Jan 22 2018 1:23AM | Last Updated: Jan 22 2018 12:39AMपिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने मिळकतकर रोख, धनादेश, डीडी आणि ऑनलाईन माध्यमातून स्वीकारला जातो. ‘कॅशलेस’ व्यवहारांना चालना देण्यासाठी आता नागरिकांना ‘पेटीएम’ मोबाईल अ‍ॅपद्वारेही मिळकतकराची रक्कम भरता येणार आहे. त्यामुळे मिळकतकर भरणा अधिक सुलभ होणार आहे. मात्र, या सुविधेसाठी विशिष्ट शुल्क पेटीएम नागरिकांना आकारणार आहे. 

पिंपरी-चिंचवड शहरात एकूण 4 लाख 70 हजार मालमत्ताधारक आहेत. एकूण 2 लाख 38 हजार 546 नागरिकांनी 31 डिसेंबर 2017 पर्यंत तब्बल 311 कोटी 60 लाख रुपयांचा मिळकतकर भरला आहे. त्यांतील 1 लाख 1 हजार 12 मालमत्ताधारकांनी 112 कोटी 52 लाख रुपये ऑनलाईनद्वारे जमा केले आहेत. शहरात ऑनलाईनमाध्यमातून कर भरण्यास अधिक पसंती दिली जात आहे.  महापालिकेच्या संकेतस्थळावरून जाऊन ऑनलाईन कर भरता येतो.

त्याचबरोबर ऑनलाईन डिजिटल पेमेंट गेटवेकरीता पेटीएम हे अ‍ॅपची सुविधा महापालिका सुरू  करीत आहे. ही सुविधा प्रायोगिक तत्वावर एक वर्षे कालावधीसाठी असणार आहे. नागरिकांचा समाधानकारक प्रतिक्रिया लक्षात घेऊन त्यास त्यास आणखी एका वर्षांची मुदत वाढ देण्याचा विचार आहे. या सेवेसाठी महापालिका पेटीएमला कोणत्याही प्रकारचे शुल्क अदा करणार नाही. पेटीएमवर जमा होणार कर त्याच दिवशी महापालिकेच्या बँक खात्यात जमा करावा लागणार आहे. अन्यथा प्रत्येकी 100 रूपयांसाठी प्रति दिनी 5 रूपये व्याज आकारला जाणार आहे. 

मात्र, कर भरणार्‍या नागरिकांकडून पेटीएम शुल्क वसुल करणार आहे. नेटबँकींगसाठी 5 रूपये शुल्क, क्रेडीट कार्डसाठी 0.80 टक्के रक्कमेवर शुल्क, डेबीट कार्डवरील 2 हजार रूपयांसाठी 0.50 व 0.75 टक्के शुल्क आकारले जाणार आहे. पेटीएम वॉलेटसाठी 5 रूपये शुल्क असणार आहे. या शुल्कासह इतर सेवा व सुविधा शुल्क नागरिकांना भरावा लागणार आहे. सदर पेटीएम सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्याचा विषय बुधवारी (दि.24) होणार्‍या स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे.