Tue, Apr 23, 2019 10:09होमपेज › Pune › इंधन दरवाढीनंतर आता प्रवाशांच्या खिशावर डल्ला

इंधन दरवाढीनंतर आता प्रवाशांच्या खिशावर डल्ला

Published On: Jun 08 2018 1:23AM | Last Updated: Jun 07 2018 11:05PMपिंपरी ः प्रतिनिधी

मागील काही दिवसांपासून इंधन दरवाढीचा भडका उडाला असून त्याचा परिणाम आता जनसामान्यांवर होऊ लागला आहे. त्यात एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेसच्या तिकीट दरात येत्या 15 तारखेपासून 18 टक्के वाढ लागू होणार असल्याने प्रवाशांच्या खिशावरही डल्ला मारण्यात आला आहे. त्यामुळे आधीच महागाईने त्रस्त असून दररोज कुठल्या ना कुठल्या गोष्टीत वाढ असल्याने जगणे मुश्किल झाल्याची भावना नागरिकात व्यक्त होत आहेत. 

पासधारकांनाही दरवाढीचा बसणार फटका आहे. सातत्याने सुरू असलेल्या इंधन दरवाढीमुळे महागाईने कहर केला आहे. त्यात आता भाडेवाढ झाल्याने दरमहा किंवा त्रैमासिक पासधारकांनाही या दरवाढीचा फटका बसणार आहे.   त्यामुळे विद्यार्थी व पासधारकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. 

खतेही महाग, कर्ज महाग 

शहरी भागांप्रमाणे ग्रामीण भागातील घटकांनाही महागाईची झळ सोसवेनासी झाली आहे. शेतकर्‍यांना एकीकडे कर्जमाफीचे पोकळ आश्‍वासन देतांनाच मालाला भाव मिळावा यासाठी संघर्ष करावा लागत आहे. त्यात आता खतांच्या किंमतीत नेहमीपेक्षा वाढ झाल्याने  बळीराजालाही झळ पोहोचली आहे. रिझर्व्ह बँकेने रेपो रेट वाढवल्याने कदाचित यापुढे कर्ज महागणार तसेच कर्जदारांचा हप्ताही वाढणार आहे. त्यामुळे महागाईने नागरीक मेटाकुटीस आल्याची स्थिती सध्या निर्माण झाली आहे.

भाजीपाला कडाडला, गृहिणी वैतागल्या

शेतकरी संपाचा फटका तसेच इंधन दरवाढीचा परिणाम म्हणून वाहतूक दरात वाढ झाल्याने भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडले आहेत. मागील काही महिन्यांपासून पेट्रोल व डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे बस, टेम्पो, ट्रक वाहतूकदारांनी काही काळ झळ सोसून आता अप्रत्यक्षरीत्या भाडेवाढ करण्यास सुुरुवात केली आहे. जून महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा भस्मासूर उभा रहिलाय. जून महिन्याच्या सुरुवातीपासून  पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दणकून वाढ झालीय. त्यामुळे भाजीपाला महागलाय. भाज्यांचे दर 80 ते 120 रुपयांच्या घरात पोहोचलेत. त्यामुळे गृहिणी वैतागल्या असून त्यांचे घरातील बजेट कोलमडले असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया गृहिणींनी व्यक्त केल्या.