होमपेज › Pune › वाहतुकीची माहिती आता एका क्लीकवर

वाहतुकीची माहिती आता एका क्लीकवर

Published On: May 04 2018 1:50AM | Last Updated: May 04 2018 12:26AMपुणे : प्रतिनिधी

घरातून बाहेर पडताना इच्छित स्थळी जाण्यासाठी, कोणत्या रस्त्यावर वाहतुकीची स्थिती काय आहे, याची माहिती आता पुणेकरांना एका क्लिकवर मिळणार आहे. त्याचबरोबर शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी स्मार्ट सिटीकडून लावण्यात आलेल्या डिस्प्ले बोर्डावरही वाहतूक व्यवस्थेची माहिती उपलब्ध होणार आहे. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत ही सेवा मिळणार आहे.

स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. (पीएससीडीसीएल) आणि टॉमटॉम या नेव्हीगेशन क्षेत्रातील कंपनीमध्ये यासंबधीचा सामंजस्य करार झाला आहे. त्या अंतर्गत स्मार्ट सिटी कंपनीच्या वाहतूक व्यवस्थापन अंतर्गत ‘लाइव्ह ट्रॅफिक रिअल टाईम अपडेट इन्फॉर्मेशन’ ही सेवा पुणेकरांना उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी वाहतूक पोलिस उपायुक्त अशोक मोराळे, टॉमटॉम कंपनीच्या भारताच्या सरव्यवस्थापक बार्बरा बेलपेयर उपस्थित होत्या. 

टॉमटॉम कंपनीकडून जगभरातील मोठ्या शहरांच्या वाहतुकीचा अभ्यास केला जातो. त्यानुसार, उपग्रहाच्या आधारे ‘लाइव्ह ट्रॅफिक रिअल टाईम अपडेट इन्फॉर्मेशन’ उपलब्ध करून दिली जाते. स्मार्ट सिटीकडून शहरात सुमारे 161 ठिकाणी स्मार्ट डिजिटल डिस्प्ले उभारण्यात आले आहेत. या डिस्प्लेवर टॉमटॉम कंपनीच्या माध्यमातून शहरातील वाहतुकीची सद्य:स्थिती नागरिकांना  मिळणार आहे. त्यानुसार शहरातील रस्त्यांवरील  तसेच जोड रस्त्यावर वाहतुकीची नक्की काय स्थिती आहे. याची माहिती स्मार्ट  डिस्प्लेवर नागरिकांना मिळेल. येत्या 15 मेपासून या डिस्प्ले बोर्डावर ही माहिती मिळण्यास सुरवात होणार आहे. 

मोबाईल अ‍ॅप आणि सोशल मीडिया 

या योजनेच्या टप्प्यात  वाहतुकीचे मोबाईल अ‍ॅप विकसित केले जाणार आहे. या अ‍ॅपवर शहरातील प्रत्येक रस्त्यावरील वाहतुकीची, त्या रस्त्यावर सुरू असलेल्या कामाची माहिती नागरिकांना मिळेल. तसेच  ज्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी असेल, महापालिकेचे खोदाईचे काम सुरू असेल, त्याची माहिती सोशल मीडियाच्या तसेच मेसेजच्या माध्यमातून पुणेकरांना मिळणार आहे.