Sat, Feb 16, 2019 08:44होमपेज › Pune › डीएसकेंच्या संपत्तीवर टाच; जप्तीची अधिसूचना

डीएसकेंच्या संपत्तीवर टाच; जप्तीची अधिसूचना

Published On: May 13 2018 2:16AM | Last Updated: May 13 2018 1:41AMपुणे : प्रतिनिधी 

घर प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करणार्‍यांना कोट्यवधींची फसवणूक केल्याप्रकरणी अटकेत असणारे बांधकाम व्यावसायिक दीपक सखाराम कुलकर्णी ऊर्फ डीएसके यांच्या मालमत्तेवर अखेर सरकारने टाच आणली आहे. 

त्यासंदर्भात गृहविभागाने नुकतीच संपत्ती जप्तीची अधिसूचना जारी केली आहे. यामध्ये कुलकर्णी यांनी खरेदी केलेले भूखंड, विविध कंपन्यांच्या नावाने असलेली बँकखाती  तसेच वैयक्तिक बँक खाती अशी एकूण 274 बँकखाती, 46 अलिशान मोटारी आणि दुचाकी जप्त करण्यात येणार आहेत. 

ठेवीदारांच्या हितसंरक्षण कायद्यान्वये (एमपीडीए) तसेच फसवणूक कायद्याअंतर्गत डीएसकेंवर गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय फसवणूकप्रकरणी कुलकर्णी व त्यांची पत्नी हेमंती यांच्याविरुद्ध पुण्यातील शिवाजीनगर, कोल्हापूर, मुंबई येथील पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. कुलकर्णी दांपत्य सध्या येरवडा कारागृहात आहे. काही दिवसांपूर्वी शासनाने कुलकर्णी यांच्या मालमत्तेचा शोध घेण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या होत्या. त्यानुसार पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून तसेच प्रशासनाकडून  कुलकर्णी यांच्या मालमत्तेचा शोध घेऊन त्याची यादी तत्कालीन जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्याकडे पाठविली होती. कुलकर्णी यांच्या मालमत्तेची यादी शासनाकडे पाठविण्यात आली होती. त्यानुसार कुलकर्णी यांच्या मालमत्ता जप्तीची अधिसूचना गृहविभागाकडून प्रसिद्ध केली आहे. 

या मालमत्तेमध्ये जमीन, वाहने, बँकेतील रकमेचा समावेश आहे. ठेवीदारांनी केलेल्या गुंतवणुकीतून कुलकर्णी यांनी मालमत्ता जमविली असल्याचे अधिसूचनेत म्हटले आहे.