Fri, Jul 19, 2019 13:26होमपेज › Pune › पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनाची अधिसूचना

पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनाची अधिसूचना

Published On: Jul 18 2018 12:20AM | Last Updated: Jul 18 2018 1:09AMपुणे : प्रतिनिधी

पुणे- पुरंदर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी नागरी हवाई विभागाची परवानगी आणि राज्य शासनाची मान्यता मिळाल्यानंतर आता शासनाने भूसंपादनाची अधिसूचना काढली आहे.पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनाची अधिसूचना राज्य शासनाने काढणे आवश्‍यक होते. यासाठीचा प्रस्ताव मागील तीन महिन्यांपूर्वी  महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने (एमएडीसी) शासनाला सादर केला होता. त्यावर शासनाने निर्णय घेतला आहे.  पुरंदर विमानतळाची अधिसूचना निघाली असल्याने विमानतळ उभारण्यासाठीच्या प्रत्यक्ष कामांना सुरुवात करता येणार आहे.

पुरंदर तालुक्‍यातील पारगाव, खानवडी, मुंजवडी, एखतपूर, कुंभारवळण, वनपुरी आणि उदाची वाडी या सात गावातील जागा राज्य सरकारकडून विमानतळासाठी निश्‍चित करण्यात आली आहे. या जागेला महत्वाच्या असलेल्या संरक्षण विभागाबरोबरच एअरपोर्ट ऍथॉरिटी ऑफ इंडियासह केंद्र शासन स्तरावरील विविध विभागांच्या मान्यता मिळाल्या आहेत. विमानतळासाठी विविध विभागांच्या ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्यानंतर राज्य शासनानेही वेगाने हालचाली करत पुरंदर विमानतळासाठी निधीची तरतूद केली. पुरंदर विमानतळासाठी सात गावातील 2 हजार ८३२ हेक्‍टर जागेची आवश्‍यकता आहे. जमिनीच्या मोबदल्यासाठी 2 हजार 713 कोटी रुपये, तर फळझाडे, विहिरी, ताली आदींसाठी 800 कोटी रुपये अशी एकूण 3 हजार 515 कोटी रुपयांच्या खर्चास शासनाने मान्यता दिली आहे.

महाराष्ट्र प्रादेशिक ऩियोजन व नगररचना अधिनियम १९६६ च्या कलमा अंतर्गत ही अधिसुचना काढण्यात आली आहे. या करीता महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लीमीटेड ची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणुन नेमणुक करण्यात आली आहे. सदर जागेच्या अधिग्रहण करिता पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) यांचे कार्यालय विशेष नियोजन प्राधिकरण म्हणुन काम पाहणार आहेत. 

सदर विमानतळा करीता मौजे वनपुरी, कुंभारवळण, उदाचीवाडी, एखतपुर, मुंजवडी, खानवाडी, व पारगाव या गावांमधील अंदाजे २८३२ हेक्टर संपादीत करण्यात येणार आहे. तसेच या प्रस्तावीत विमानतळाचे नाव हे छत्रपती संभाजी राजे अंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणुन नामनिर्देशित करण्यात आले आहे.विमानतळासाठी २८३२ हेक्टर जमिनी अधिसूचित करून महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीला 'विकास प्राधिकरण' म्हणून मान्यता देणारी अधिसूचना आज मंगळवारी राज्य सरकारने प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे सात गावातील ही जमीन संपादित करण्याचा मार्गही मोकळा झाला आहे.भूसंपादनात सर्वाधिक १०६७ हेक्टर जमिनी पारगाव मेमाणे या गावातील आहे वनपुरी ३३९, कुंभारवळण ३५१,उदाचीवाडी, ३६१,एखतपूर २१७ मुंजवडी १४३,खानवडी ४८४ हेक्टर अशी इतर गावातील जमिनी अधिसूचित करण्यात आली आहे.