Mon, Mar 25, 2019 17:28होमपेज › Pune › पिंपळे गुरव, सांगवीतील अनधिकृत बांधकामांना नोटिसा

पिंपळे गुरव, सांगवीतील अनधिकृत बांधकामांना नोटिसा

Published On: Jan 16 2018 2:07AM | Last Updated: Jan 16 2018 1:55AM

बुकमार्क करा
पिंपरी : प्रतिनिधी 

पिंपळे गुरव, सांगवी व नवी सांगवी परिसरातील अनधिकृत बांधकामांसह चालू अनधिकृत बांधकामांची पाहणी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाच्या पथकााच्या वतीने सोमवारी (दि.15) करण्यात आली. निदर्शनास आलेल्या अनधिकृत व चालू बांधकामांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. पोलिस बंदोबस्त मिळताच संबंधित बांधकामांवर कारवाई केली जाणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी पत्रकार परिषदेत भाजपाच्या दबावामुळे महापालिका प्रशासन पिंपळे गुरव, सांगवी व नवी सांगवी परिसरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करीत नसल्याचा आरोप केला होता. या संदर्भात ‘पुढारी’ने ‘अनधिकृत बांधकामांना भाजपा शहराध्यक्षांचे पाठबळ’ या शीर्षकखाली छायाचित्रासह ठळक बातमी सोमवारी प्रसिद्ध केली होती. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने त्या परिसरात सोमवारी तातडीने पाहणी केली. विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत पाटील, अधिकारी व बीट निरीक्षकांच्या पथकाने ही पाहणी केली. 

पाहणीत पिंपळे गुरव, सांगवी व नवी सांगवी परिसरात अनधिकृत बांधकाम व चालू अनधिकृत बांधकामे आढळून आली. एकूण 8 ते 10 चालू बांधकामे पाहणीत निदर्शनास आली. त्यांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. पोलिस बंदोबस्त उपलब्ध होताच अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली जाईल. 

या संदर्भात महापालिकेच्या स्थापत्य विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत पाटील यांनी सांगितले की, महापालिकेच्या वतीने नियमितपणे शहरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली जात आहे. पिंपळे गुरव, सांगवी व नवी सांगवी परिसरात निदर्शनास आलेल्या अनधिकृत बांधकामांना या पूर्वी वेळोवेळी नोटिसा दिलेल्या आहेत. पोलिस बंदोबस्त मिळत नसल्याने कारवाईस विलंब होत आहे. पुरेसा पोलिस बंदोबस्त उपलब्ध होताच अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली जाईल.