Tue, Jul 23, 2019 06:41होमपेज › Pune › अवाजवी भाड्यामुळे 3 कंपन्यांना नोटिसा

अवाजवी भाड्यामुळे 3 कंपन्यांना नोटिसा

Published On: May 09 2018 1:50AM | Last Updated: May 09 2018 1:33AMपुणे : प्रतिनिधी

उन्हाळ्याच्या सुटीत होणार्‍या गर्दीच्या पार्श्‍वभूमीवर, हतबल प्रवाशांना लुटणार्‍या ट्रॅव्हल्स कंपन्यांनो आता सावधान...! कारण, प्रवाशांकडून असे जादा भाडे घेऊन लूट करणार्‍या खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांवर आरटीओने करडी नजर ठेवली असून, तीन ट्रॅव्हल्स कंपन्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्याची माहिती आरटीओ अधिकार्‍यांनी दिली.खासगी ट्रॅव्हल्स कंपन्या राज्य परिवहन मंडळाच्या (एसटी) गाड्यांना असलेल्या भाड्यापेक्षा जास्तीत जास्त दीडपट जादा भाडे आकारू शकतात, असे आदेश राज्य शासनाने दिले होते. त्यानुसार प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) शहरात खासगी बसचालकांची तपासणी केली जात आहे. 

शिवाजीनगर, वाकडेवाडी, स्वारगेट, लक्ष्मीनारायण टॉकीज, दांडेकर पूल, पद्मावती, कोथरूड यांसारख्या ठिकाणी असलेल्या खासगी ट्रॅव्हल्सच्या थांब्यांवर आरटीओकडून कसून तपासणी करण्यात आली. काही नागरिकांनी ऑनलाईनद्वारे तिकिटांचे दर पाहून, आरटीओकडे यासंदर्भात तक्रार देण्यात आली होती. आतापर्यंत अवाजवी भाडेवाढीसंदर्भात 11 ऑनलाईन तक्रारी आल्या आहेत.त्यानुसार या तपासणीदरम्यान अवाजवी भाडे आकारण्याचे प्रकार समोर आल्याने त्यांना नोटिसा बजावण्यात आल्याचे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी स्नेहा मेढे यांनी सांगितले. जवळपास 25 वेगवेगळ्या लक्झरी, स्लिपर कोच गाड्यांची तपासणीही करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. 

प्रसन्न, चाणक्य, विदर्भ या टूर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्सना नोटिसा

नागरिकांनी तक्रार केल्यानुसार प्रसन्न, चाणक्य, विदर्भ या टूर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्सना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे. दि. 2 मे रोजी अशी नोटीस आमच्याकडून देण्यात आली असून, सात दिवसांत त्यांच्याकडून खुलासा मागण्यात आला आहे.

ग्राहक पंचायतीची कारवाईची मागणी

परिवहन मंत्र्यांनी खासगी बसच्या नियमबाह्य कारभाराविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश देऊनही कारवाई होत नाही. आरटीओ कार्यालय आणि पोलिस प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असून, खासगी बसच्या मनमानी कारभाराविरुद्ध त्वरीत कारवाई व्हायला हवी, अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे सूर्यकांत पाठक यांनी केली आहे. आरटीओच्या नियमानुसार खासगी ट्रॅव्हल्सना प्रासंगिक करारावर प्रवाशांची वाहतूक करण्याची परवानगी आहे. नियमाप्रमाणे प्रवाशांची यादी आरटीओकडून मंजूर करुन घेणे आवश्यक आहे. परंतु, या नियमाकडे खासगी बसचालक दुर्लक्ष करीत आहेत.  खासगी बससेवेवर राजकीय वरदहस्त असल्याने कारवाई होत नसल्याची शक्यता असल्याचा आरोपही त्यांनी केला.