Thu, Apr 25, 2019 04:13होमपेज › Pune › परीक्षेस मज्जाव केल्याप्रकरणी विद्यापीठाला नोटीस

परीक्षेस मज्जाव केल्याप्रकरणी विद्यापीठाला नोटीस

Published On: Dec 07 2017 1:23AM | Last Updated: Dec 07 2017 1:12AM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मराठी विभागातील विद्यार्थ्यांची उपस्थिती 75 टक्के भरली नसल्यामुळे त्यांना विद्यापीठ प्रशासानाने परीक्षा देण्यास मज्जाव केला होता. त्यामुळे हे विद्यार्थी परीक्षेला मुकले आहेत. परीक्षेपासून वंचित राहिलेल्या या विद्यार्थ्यांनी बुधवारी (दि. 6) उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. धनराज माने यांची भेट घेवून संबंधित प्रकार त्यांना सांगितला. यावर डॉ. माने यांनी विद्यापीठ अधिनियम 69 नुसार विद्यार्थ्यांना हजेरीअभावी परीक्षेस बसता येणार नाही, हे 30 दिवस अगोदर कळविणे बंधनकारक आहे. तथापि, विद्यापीठ प्रशासनाने केवळ पेपर सुरू होण्यापूर्वी अगोदर एक तास कळवले आहे. हे नियमाचे उल्लंघन असून यासंदर्भात अहवाल सादर करण्याचे आदेश विद्यापीठ प्रशासनाला दिले आहेत. 

ज्या विद्यार्थ्यांची उपस्थिती 75 टक्के उपस्थिती पूर्ण होत नाही, अशा विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता येणार नसल्याचे विद्यापीठ प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. मात्र, याबाबतीत एक पाऊल पुढे जाऊन मराठी विभागाने ज्या विद्यार्थ्यांची 75 टक्के उपस्थिती पूर्ण नाही, अशा विद्यार्थ्यांना थेट परीक्षा सुरू होण्यापूर्वी केवळ तासभर अगोदर परीक्षेस बसण्यास नकार दिला.

धक्कादायक बाब म्हणजे या विद्यार्थ्यांनी तिसर्‍या सत्रातील एक पेपर दिल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने हा निर्णय दिला. त्यामुळे विद्यार्थ्यांनी विभागाकडून जाणीवपूर्वक आपल्याला मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप करत उच्चशिक्षण विभागाचे संचालक डॉ. माने यांची भेट घेतली. घडलेला प्रकार विद्यार्थ्यांकडून ऐकून घेऊन डॉ. माने यांनी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अरविंद शाळीग्राम यांना त्यासंदर्भात पत्र पाठवले.

विद्यापीठाच्या परिपत्रक क्रमांक 23-2010 मधील अध्यादेश 69 प्रमाणे कार्यवाही झाल्याचे दिसून येत नाही. तरी याबाबत उचित कार्यवाही करून अहवाल संचालनालयास सादर करावा असे त्यांनी विद्यापीठाला पाठविलेल्या नोटीशीत म्हटले आहे. यामुळे आता विद्यापीठ प्रशासनाला केलेल्या कार्यवाहीबद्दल सविस्तर माहिती सादर करावी लागणार आहे.