Thu, Apr 18, 2019 16:06होमपेज › Pune › सफाई कामगारांना पगार न दिल्याने ठेकेदारांना नोटीस  

सफाई कामगारांना पगार न दिल्याने ठेकेदारांना नोटीस  

Published On: Jul 23 2018 1:10AM | Last Updated: Jul 23 2018 12:47AMपिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहरातील रस्ते व गटर स्वच्छ करणार्‍या कामगारांना तब्बल 3 महिन्यांचा पगार न दिल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाने 7 पैकी 5 ठेकेदारांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या संदर्भात तातडीने खुलासा करण्याबाबत संबंधित ठेकेदारांना ताकीद देण्यात आली आहे. 

पालिकेच्या वतीने शहरातील रस्ते व गटर्स सफाईसाठी 8 क्षेत्रीय कार्यालय हद्दीनुसार सफाईचे काम करून घेतले जाते. शहरातील एकूण 7 स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थेच्या ठेकेदारांमार्फत 1 हजार 529 सफाई कामगार नेमले आहेत. त्या कामगारांकडून पालिका सफाईचे काम करून घेते. पालिकेचे आरोग्य निरीक्षक त्यांच्याकडून सफाईचे काम करून घेतात. नव्या नियमानुसार पालिकेतर्फे किमान 16 हजार 600 रुपये पगार दिला जातो. ही रक्कम कामगार संख्येनुसार संबंधित ठेकेदारास महिना पूर्ण झाल्यानंतर अदा केली जाते. या सफाई कामाचा 2 वर्षांचा ठेका असून, तो जानेवारी 2018 पासून सुरू झाला आहे. 

संबंधित ठेकेदारांकडे काम करणार्‍या सफाई कामगारांना गेल्या 3 महिन्यांचा पगार मिळाला नाही; तसेच त्याचा पगार ज्या बँक खात्यात जमा होतो, त्या बँकेचे पासबुक व एटीएम कार्ड संबंधित ठेकेदारांने स्वत:कडे ठेवले आहे. त्याच्या बँक खात्यातून परस्पर संपूर्ण पगार काढून केवळ 6 ते 7 हजार रूपये वेतन दिले जाते. तसेच, विविध सुविधा पुरविल्या जात नाहीत. तक्रार केल्यास कामावरून काढून टाकण्याची धमकी दिली जाते, असा आरोप करीत स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था फेडरेशन आणि कष्टकरी कामगार संघटनेने पालिकेवर मोर्चा काढला होता. त्या संदर्भातील तक्रार पालिकेचे आयुक्त  श्रावण हर्डीकर यांच्याकडे तक्रार केली होती. त्यावर आरोग्य विभागाने कारवाई केली आहे. 

कामगारांचे पगारातून पीएफ, ईएसआय, व्यवसाय कर, सानुग्रह अनुदानाची अशी एकूण 4 हजार 960 रुपयांची कपात करून उर्वरित 11 हजार 640 याची रक्कम त्यांना दिली पाहिजे. मात्र, तसे होत नसल्याची कामगारांची तक्रारी आहे. संबंधित कामगारांना पगार दिल्याचा  त्यांच्या बँक बचत खात्याचा नोंदीची कागदपत्रे सादर केल्यानंतर मार्च व त्या पुढील महिन्यांच्या पगारांची रक्कम देण्याचे आरोग्य विभागाने पूर्वी जाहीर केले आहे. मात्र, 7 पैकी केवळ 2 ठेकेदारांनी बँक खात्याच्या नोंदी संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडे सादर केल्या आहेत. उर्वरित 5 ठेकेदारांनी नोंदीचे कागदपत्रे सादर केलेली नाहीत. त्यामुळे कामगारांचा पगार होत नाही. तक्रारीनुसार 5 ठेकेदारांना पालिकेने कारणा दाखवा नोटीस बजावली आहे. सर्व सफाई कामगारांचे बँक खाते नोंदी तातडीने जमा न केल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.  दरम्यान, बँकेचे पासबुक व एमटीएम कार्ड घेणार्या आणि परस्पर पगार काढून घेणार्या ठेकेदारांच्या विरोधात काही कामगारांनी पोलिसात तक्रार नोंदविली आहे.